नवी दिल्ली : निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणात फाशी ठोठावलेल्या विनय आणि मुकेश या आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली दुरूस्ती याचिका मंगळवारी फेटाळण्यात आली. न्या.एनव्ही रमणा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा निर्णय दिला. त्यामुळे आरोपींना २२ तारखेला फाशी दिली जाणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
न्यायाधिशांच्या कक्षात ही याचिका फेटाळण्याचा निर्णय घेण्यात आला. आरोपींना फाशीपासून वाचण्याचा हा अंतिम मार्ग होता. न्या. एनव्ही रमणा, अरूण मिश्रा, आरएफ नरीमन, आर. भानुमथी, आणि अशोक भुषण यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला. या प्रकरणात फाशी ठोठावलेल्या विनय शर्मा आणि मुकेश या दोघांनी ही याचिका दाखल केली होती.
ही दुरूस्ती याचिका हे आरोपींच्या बचावाचा अंतीम मार्ग होता. फेरविचार याचिका दाखल फेटाळल्यानंतर त्यांनी हा मार्ग अनुसरला होता. मुकेश (३२ ), पवन गुप्ता (२५), विनय शर्मा (२६) आणि अक्षय कुमार सिंह (३१) या आरोपींवर दिल्ली न्यायलयाने २२ जानेवारीला सात वाजता फाशी द्यावी म्हणून डेथ वॉरंट काढले आहे. निर्भया या २३ वर्षीय पॅरीमेडिकल विद्यार्थीनीवर १६ डिसेंबरच्या मध्यरात्री सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी निर्घृण मारहाण केली. निर्भयाचा उपचार सुरू असताना २९डिसेंबर २०१२रोजी सिंगापूरमध्ये मृत्यू झाला.
या प्रकरणात सहा जणांना दोषी ठरवण्यात आले. त्यातील एकाने कारागृहात आत्महत्या केली. एका अल्पवयीनाने तीन वर्ष सुधारगृहात काढल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली.