पुणे : पुण्याहून मुंबईला जाताना लोणावळ्याच्या घाटातून दिसणारा ‘ड्यूक्स नोज सुळका’ प्रत्येक प्रस्तरारोहण करणाऱ्याला साद घालत असतो. हा सुळका अतिशय प्रसिद्ध असून “नागफणी” या नावानेही तो ओळखला जातो.
पुण्यातील सिंहगड स्थित नामवंत गिर्यारोहण संस्था एस एल एडव्हेंचर कायमच नवनवीन सुळके करीत आली आहे. या वेळेस संचालक लहू उघडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक अनोखी मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ३०० फुटांचा ड्यूक्स नोझ व २०० फुटांची तैलबईला सुळक्याची अवघड अशी पुढील बाजू सर करणे आणि तेही एकापाठोपाठ एक दिवसात. कठीण होते. परंतु
आपल्या कसलेल्या क्लाईम्बर टीमच्या शारीरिक क्षमतेची आणि गुणवत्तेची परीक्षा पाहणारी ही मोहीम यशस्वी करून दाखवण्याचा निर्णय तर केव्हाच झाला होता.
मोहिमेचा आराखडा बनविण्यात आला होता. त्यानुसार १८ तारखेला ड्यूक्स नोज आणि १९ तारखेला तैल बैला सुळक्याची पुढील बाजू सर करण्याचे ठरविण्यात आले.
अचानक वाढलेली थंडी आणि कमी पडणारी वेळ अशा दुहेरी अडचणींचा सामना करत दोन्ही सुळक्यांना टीम भिडली.
लीड क्लाईम्बर वजीरवीर कृष्णा मरगळे यांनी लीड केले तर भारती विद्यापीठचे शिरीष कुलकर्णी आणि अण्णा मरगळे यांनी सेकंड मन होऊन बिले दिला.
भारती विद्यापीठचे मानसिंह चव्हाण तसेच लहू उघडे, तुषार दिघे, रोहित अंदोडगी, संदेश इवलेकर या सर्वांनी दोन्ही सुळके यशस्वीपणे सर केले. १८ तारखेला “ड्यूक्स” सर केला आणि १९ तारखेला सकाळी “तैल बैला” सुळक्याच्या माथ्यावर सर्वांनी तिरंगा फडकवलाच होता की बेस वरती लहू यांना गिर्यारोहण क्षेत्रातील गुरुवर्य अरुण सावंत यांची दुःखद बातमी समजली, की त्यांचा कोकणकडा प्रदक्षिणा मोहिमेदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. एकीकडे मोहीम फत्ते झाल्याचा आनंद आणि दुसरीकडे निस्वार्थीपणे सर्वांना मार्गदर्शन करणारे गिरारोहण क्षेत्रातील द्रोणाचार्य हरवल्याचे दुःख होते.
एसएलच्या टीमने तैल बैला सुळक्याच्या शिखरावरच ही मोहीम कै.अरुण सावंत सरांना आदरांजली म्हणून वाहिली आणि आपली कृतज्ञता व्यक्त केली.