दौंड : राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील मातंग समाजातील तरुणाचा झालेला निर्घृण खून, अकोला येथील तरुणीवर बलात्कार करून तिचा झालेला खून, नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील विद्यार्थीनीवर शिक्षकांनी केलेला सामूहिक बलात्कार, सातारा येथील तरुणाचा झालेला निर्घृण खून यासह विविध प्रकारच्या घटना घडत आहे. मातंग समाजावर सतत अन्याय होत असल्याच्या घटनांच्या निषेधार्थ तसेच सर्व घटनांचे खटले जलदगती न्यायालयात चालवून सर्व आरोपींवर त्वरीत कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागण्यांसाठी आज (दि.२७) रोजी मातंग समाजाच्या वतीने यवत पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येने मोर्चात मातंग समाजाचे नागरिक व महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे यांनी स्विकारले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब शहरातील कल्पना नगर येथे राहणाऱ्या मातंग समाजातील तरुण मनोत झोबांडे या तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. अकोला जिल्ह्यातील मरोल गावातील मनीषा सरकटे या तरुणीवर बलात्कार करून तिला फासावर लटकविण्यात आले होते. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील शंकरंनगर येथील साईबाबा माध्यमिक विद्यालयामध्ये विद्यार्थीनीवर नराधम शिक्षकांनी सामूहिक बलात्कार केला होता. तसेच सातारा जिल्ह्यामध्ये मातंग समाजातील तरुण तानाजी आवळे याचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. अशा विविध प्रकारच्या घटना राज्यात घडल्या आहेत. सर्व घटनांचे खटले जलदगती न्यायालयात चालवून सर्व आरोपींवर त्वरीत कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे. मातंग समाजाला न्याय न मिळाल्यास संघटनेच्या वतीने व समस्त मातंग समाजाच्या वतीने राज्यभर उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा मातंग नवनिर्माण सेनेचे राज्याचे अध्यक्ष म्हस्कु शेंडगे यांनी यवत पोलीस ठाण्याला दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे.
यावेळी म्हस्कु शेंडगे, तालुकाध्यक्ष काळूराम शेंडगे, जिल्हाध्यक्ष सोमनाथ पंचरास, जिल्ह्याचे कार्याध्यक्ष बबन खंडाळे, दौंड पंचायत समिती सदस्या निशा शेंडगे, रुपाली शेंडगे, अजय वाल्हेकर, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे तालुकाध्यक्ष दत्ता डाडर, मातंग आघाडीचे तालुकाध्यक्ष संजय अढागळे, बहुजन लोकअभियानचे तालुकाध्यक्ष विजय शेंडगे, निलेश शेंडगे यांच्यासह मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी व नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.