अहमदनगर : तासाला जाणार्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकास जिल्हा सत्र न्यायधीश एम.व्ही. देशपांडे बालकांचे संरक्षण कायद्याअंतर्गत चार वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे.
सुशिल मच्छिंद्र इंगळे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारनेर तालुक्यातील एका गावातील आरोपी गणित, विज्ञान विषयांची शिकवणी घेत असतांना पिडित मुलींची छेड काढून तिचा विनयभंग केला.
याबाबत घरी सांगितल्यास पिडितेला जिवे मारण्याचा धमकी दिली. तसेच सोशल मिडीयावर फोटो व्हायरल करेल असे सांगत मुलीची छेड काढत असे.
याबाबत मुलीने घरी सांगितले असता,त्यानंतर पारनेर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास करून पोलीस उपनिरीक्षक आर.डी.पवार यांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.
हा खटला जिल्हा सत्र न्यायधीश देशपांडे यांच्या न्यायालयात चालला. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये अल्पवयीन फिर्यादी व इतर दोन साक्षीदार यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. त्यानुसार न्यायधीश देशपांडे यांनी आरोपी सुशील मच्छिंद्र इंगळे याला चार वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. अर्जुन पवार यांनी काम पाहिले. त्यांना पोलीस हवालदार एम. व्ही. डहारे यांनी काम मदत केली.