मध्यप्रदेशात कमलनाथ सरकार देणार मास्टरस्ट्रोक

मध्यप्रदेश : मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप झाल्याचे पहायला मिळाले होते. मध्य प्रदेशात काँग्रेसचे ज्योतिरकादित्य शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. त्यापाठोपाठ ज्योतिरादित्य समर्थक २१ आमदारांनीही राजीनामा दिला आणि मध्य प्रदेशातलं कमलनाथ सरकार अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. ज्योतिरादित्य यांच्या धक्क्यामुळे  काँग्रेस अडचणीत आली आहे.
मात्र, मध्य प्रदेशात कमळ फुलणार असल्याचे संकेत मिळत असतानाच कमलनाथ ‘मास्टरस्ट्रोक’ खेळण्याच्या पवित्र्यात आहेत. मध्य प्रदेश सरकारमधले ज्येष्ठ मंत्री आणि कमलनाथ समर्थक नेते पी. सी. शर्मा यांनी तसे स्पष्ट संकेत पत्रकारांशी बोलताना दिले.

याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना त्यांना विधानसभेतल्या संख्या बळावरून त्यांना प्रश्न विचारला असता शर्मा म्हणाले, “त्यांच्याकडे संख्याबळ असेल तर आमच्याकडेही उपाय आहे. कुछ नया होने वाला है. कमलनाथ यांचा मास्टरस्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळेल.” अशा शब्दात त्यांनी काही गोष्टींचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

शर्मा यांनी काँग्रेस नेमकं काय करणार हे सांगितलं नाही. कमलनाथ दिल्लीत सोनिया गांधी यांना भेटून आल्यानंतर भोपाळमध्ये तळ ठोकून आहेत. आता शर्मा यांच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

कमलनाथ यांचा मास्टरस्ट्रोक काय असणार यावर राजकीय विश्लेषक वेगवेगळे तर्क लढवत आहेत. यापैकी सर्वात जास्त शक्यता असलेला पर्याय म्हणजे कमलनाथ सरकारमधले सर्वच आमदार राजीनामा देणार. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सर्वांचाच राजीनामा घेतला, तर सहाजिकच विधानसभाच विसर्जित होईल. अशा परिस्थितीत भाजपकडे सरकार थेट जाऊ शकणार नाही. त्याऐवजी राज्यात फेरनिवडणुका घ्याव्या लागण्याची स्थिती निर्माण होऊ लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

कमलनाथ यांचा हा मास्टरस्ट्रोक यशस्वी ठरला तर राज्यात मध्यावधी निवडणुका होतील. मध्य प्रदेशात ऑपरेशन लोटसचे सध्याचे प्रयत्न तरी अपुरे पडतील आणि त्यांनाही त्यांची रणनीती बदलावी लागेल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा