पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात या महिन्याभरात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना तूर्तास स्थगिती देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणार्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राम म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी येत्या २ ते ३ आठवड्यात सर्वांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. या संकटावर मात करण्यासाठी शासकीय यंत्रणा २४ तास दक्ष राहून कार्यरत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी राम म्हणाले, गर्दी कमी करणे हा यावर प्रभावी उपाय असून त्यासाठीच्या विविध उपाययोजना प्रशासन करत आहे. जिल्ह्यातील ६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका, ७५० ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचना, तसेच १४०० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्याच्या कार्यक्रमास सध्या स्थगिती देण्यात येत आहे.
नागरिकांनीही शक्यतो लांबचा प्रवास व स्वतः हून गर्दीत जाणे टाळावे तसेच हातांच्या स्वच्छतेबाबत दक्षता बाळगणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सामाजिक शिष्टाचार पाळून स्वतःबरोबरच समाजाची काळजी घ्यावी. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे तसेच एकमेकांसोबतचा संपर्क टाळावा, याबरोबरच लग्न समारंभ आयोजित करण्यास प्रशासनाची बंदी नसून कमीत कमी व्यक्तींच्या उपस्थितीत समारंभ घ्यावा, असे आवाहन करुन आवश्यकता भासल्यास शासकीय व खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागाच्या २९० खाटा तयार ठेवण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.