दिल्लीत कोरोना संशयिताची आत्महत्या

नवी दिल्ली: सिडीनीवरुन परतलेल्या ३५ वर्षीय कोरोना विषाणू संशयितानं दिल्लीतील साफदाराजंग रुग्णालयाच्या इमारतीवरुन उडी मारून  आत्महत्या केली आहे.  भारतात करोना व्हायरसची दहशत प्रचंड वाढत चालली आहे. महाराष्ट्रासोबतच राजधानी दिल्लीतही करोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या करोना संशयित रुग्णाने सातव्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवलं. हा रुग्ण नुकताच ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातून परतला होता. हा संशयित रुग्ण गेल्या एक वर्षापासून सिडनीतच राहत होता.

सिडीनीवरून  परतल्यानंतर या संशयिताला  दिल्लीतील रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. त्याच्या कोरोना विषाणूसंदर्भातील चाचण्या अद्यापही आल्या नव्हत्या. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णाला रात्री ९ वाजता इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाहून रुग्णालयात आणण्यात आलं होतं. त्याच्यात लक्षणं आढळून येण्यासोबतच डोकेदुखीचाही त्रास होता.

सिडीनीमधून बुधवारी भारतात परतल्यानंतर या व्यक्तीनं  विमानतळावर डोकं दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्याला उपचारांसाठी साफदाराजंग रुग्णालयात  नेण्यात आलं होतं. त्याची कोरोना विषाणूची चाचणीही करण्यात आली होती.  मात्र चाचणीचा अहवाल आला  नव्हता. डॉक्टर जेव्हा या रुग्णाच्या रुममध्ये गेले तेव्हा तो आढळला नाही. पण दुसऱ्या एका डॉक्टरला ९.१५ वाजता इमारतीच्या खाली मृतदेह आढळून आला. या महिला डॉक्टरने तातडीने घटनेची माहिती दिली, पण तोपर्यंत रुग्णाचा मृत्यू झाला होता.