इंदापूर : (दि. २३ एप्रिल २०२०)
डॉक्टर हे देवासारखे असतात परंतु इंदापूर उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टर मात्र याला अपवाद ठरलेत. सध्या कोरोनाच्या लॉकडाऊनमध्येही काही डॉक्टरांना घटनेचे गांभीर्य समजले नाही याची दुर्दैवी प्रचिती इंदापूर मध्ये बुधवारी दि. २२ रोजी आली. लॉकडाऊन आणि सीमाबंदी असताना, साडेचार महिन्यांचे मृत अर्भक पोटात घेऊन एका महिलेला जीवाची फरफट करायला लावल्याने पुणे जिल्ह्यातील इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
इंदापूर तालुक्यातील भांडगांव येथील सारिका गोपाळ लोखंडे या गर्भवती होत्या. मात्र त्यांच्या पोटात वाढणारे अर्भक मृत असल्याचे समजल्यावर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मृत अर्भक प्रसूति करुन बाहेर काढण्यासाठी त्या बावडा ग्रामीण रूग्णालयात गेल्या. तेथील डॉक्टरांनी त्यांना इंदापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात जाण्याची शिफारस केली. त्यानुसार १७ एप्रिल रोजी दोघेही पती-पत्नी इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात दुपारी एक वाजता दाखल झाले. त्यानंतर सर्व कागदपत्रे तयार करण्यात आली. पेशंटला स्वतंत्र खाट देखील देण्यात आली. मात्र तब्बल पाच तास कोणताही उपचार न करता ताटकळत ठेवल्यानंतर येथील डॉक्टरांनी उपचार करण्याबाबत असमर्थता दर्शविली. पुणे किंवा सोलापूर उपचार घेण्याच असला देत येथील डॉक्टरांनी या जोडप्यास, पावणेसहा वाजता थेट घरचा रस्ता दाखवला.
दरम्यान अशा अवस्थेत बायकोचा जीव वाचवण्यासाठी पतीने थेट दुचाकीवरुन सोलापूर जिल्ह्यातील अकलूज गाठले. सामाजिक कार्यकर्ते गफुर सय्यद, डॉ. अक्षय वायकर व माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या मदतीने त्या पिडीत महिलेची उपजिल्हा रुग्णालयातचं प्रसूती करण्यात आली. राष्ट्र सेवा दलाच्या जिल्हा संघटकांनी याचा तीव्र निषेध नोंदवला आहे.
याबाबत, इंदापूर उपजिल्हा रुगणालयाचे अधिक्षक डॉ. राजेश मोरे यांनी मात्र, बारा आठवड्याच्या पुढील गर्भ असल्याने आम्ही उपचार केले नाहीत, असा खुलासा केला. काही दिवसांपूर्वीच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी डॉ. मोरेंसह सर्व स्टाफची कानउघाडणी केली होती. यानंतर कामात सुधारणा करण्याचे तर सोडाचं पण कोरोनाच्या संकटात आणि जिल्हाबंदीच्या काळातही या डॉक्टरांना आपल्या कर्तव्याची जाणीव नसावी यापेक्षा मोठे दुर्दैव काय?
न्युज अनकट प्रतिनिधी- योगेश कणसे.