मजूरांसाठी विशेष रेल्वे सोडा: अजित पवार

मुंबई : (दि. २३ एप्रिल २०२०)
केंद्र सरकारने २४ मार्चपासून देशव्यापी टाळेबंदी लागू केल्यापासून उत्तरप्रदेश, बिहारसह देशाच्या विविध राज्यातील मजूरबांधव महाराष्ट्रात ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. येत्या ३ मे रोजी लॉकडाऊन संपल्यानंतर रेल्वे सुरू झाल्यावर राज्यातील विविध भागात थांबलेले परप्रांतीय मजूर त्यांच्या घरी जाण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडून गर्दी करण्याची शक्यता आहे. याआधी देखील केवळ एका अफवेमुळे रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी घडल्याचं उदाहरण समोर आहे. ३ मे रोजी असे काही घडून कायदा व सुव्यवस्थेला अडचण निर्माण होऊ नये म्हणून या मजूरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मुंबई आणि पुण्यातून विशेष रेल्वे सोडण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे.
राज्यशासनाच्या शिबिरांमध्ये सध्या साडेसहा लाख मजूर राहत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील या आधी अशी मागणी केंद्र सरकारकडे केली होती. याबाबत निर्णय देताना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी कोणतीही विशेष रेल्वे सोडण्यात येणार नसल्याचं सांगत मुख्यंत्र्यांची मागणी फेटाळून लावली होती.
नितीन गडकरी यांच्या या निर्णयानंतर अजित पवार यांनी आज पुन्हा याबाबत मागणी करत सांगितले की महाराष्ट्रातील परप्रांतीय मजूरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी, मुंबई व पुण्यातून विशेष रेल्वेगाड्या सोडल्यास, या मजूरांना सुरक्षित घरी जाता येईल तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका टाळता येईल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा