गुणवत्तापूर्ण शिक्षणात तडजोड नाही : अ.भा.वि.प.

पुणे: कोरोनाचे थैमान रोखण्यासाठी तसेच त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता बाकी संपूर्ण सेवा बंद आहेत. त्यामध्ये राज्यातील सर्व विद्यापीठे व शैक्षणिक संकुल बंद आहेत. सध्याचा काळ परिक्षेचाअसतानाही कोरोना महामारीच्या परिस्थितीमुळे परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच महामहीम राज्यपाल यांचा राज्यातील सर्व कुलगुरूंबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली व त्यातून एक “कुटुंब समिती ” , परीक्षे संदर्भात निर्णय घेण्यासाठी निश्चित करण्यात आली होती. या समितीने राज्यामध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे, या निर्णयाचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्वागत करत असल्याचे अभाविपचे प्रदेश मंत्री श्री. स्वप्नील बेंगडे यांनी सांगितले, तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत अभाविप तडजोड करणार नसल्याचे देखील सांगितले.

मुंबई, पुणे, संभाजीनगर, नागपूर, नाशिक यासारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असले तरी राज्यातील काही जिल्हे कोरोना मुक्त आहेत. त्यामुळे परीक्षेचे धोरण ठरवताना राज्यातील या सर्व बाबींचा विचार करावा, अशा प्रकारचे निवेदनही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांना अभिविप ने दिले आहे. तसेच राज्यपाल लॉकडाउन उठल्यानंतर परीक्षा घेताना काय उपाययोजना केल्या पाहिजेत या प्रकारच्या सूचनाही अभाविप ने केल्या आहेत, त्या सूचना खालील प्रमाणे आहेत.

सूचना:

१) लॉकडाउन संपल्यानंतर लगेच महाविद्यालये सुरु न करता ती केंद्रीय मंत्री परिषदेने सुचवलेल्या निर्देशानुसार मे महिन्याच्या १६ तारखेपासून सुरु कराव्यात

२) सध्याची परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्रातील आरोग्य विद्यापीठ वगळता अन्य सर्वच विद्यापीठांची परीक्षा एकाच ठराविक वेळेत घेण्यात याव्यात, जेणेकरून निकाल लावणे व पुढील शैक्षणिक सत्र एकाच वेळी सुरु होण्यास मदत होईल.

३) विद्यापीठांच्या सर्व वर्षाच्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात याव्यात, कोणतीही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेऊ नये कारण, त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होईल.

४) अचानक आलेल्या परिस्थितीमुळे नियमित शैक्षणिक तास पूर्ण होऊ शकलेले नाहीत त्यामुळे अनेक विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर वर्षाचे अभ्यासक्रम हे पूर्ण शिकवून झालेले नाही हे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी काही ठिकाणी ऑनलाईन क्लासेस ही घेण्यात आले परंतु नेट कनेक्टिव्हिटी व विद्यार्थ्यांचा सहभाग यावर मतांतरे आहेत.

५) विद्यार्थ्यांनी आपले सर्व शैक्षणिक शुल्क भरले असल्यामुळे त्यांना त्यांचे शिक्षण मिळवण्याचा संपूर्ण अधिकार आहे त्यामुळे महाविद्यालय सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम विद्यार्थ्यांचे बुडालेले शैक्षणिक ताल भरून काढून अभ्यासक्रम शिकवून पूर्ण करावेत व त्यानंतर परीक्षा घ्याव्यात. या धोरणामुळे शैक्षणिक गुणवत्ता टिकून राहण्यास मदत होईल, शक्य असल्यास आता लॉकडाऊन दरम्यान अन्य शिकवणी पद्धतीचा अवलंब करण्यात यावा. तसेच उर्वरित अभ्यासक्रम महाविद्यालये सुरू झाल्यावर पूर्ण करण्यात यावे.

६) प्रात्यक्षिक, इंटरनल असाइनमेंट , प्रोजेक्टस् देण्याकरिता पुरेसा वेळ देण्यात यावा, परीक्षा घेताना सोशल डिस्टन्स चा विचार व्हावा.

७) महाविद्यालये सुरु झाल्यानंतर सार्वजनिक व्यवस्थेवरील ताण लक्षात घेता तो कमी करण्यासाठी टप्याटप्याने परीक्षा घेण्यात याव्या
उदाहरणार्थ: प्रथम, द्वितीय, वर्ष परीक्षा अगोदर नंतर पदवी व पदव्युत्तर वर्ष असे.

८) पुढील विविध अभ्यासक्रमातील प्रवेश व भविष्यातील रोजगारांची संधी लक्षात घेता महाविद्यालये सुरू झाल्यानंतर सर्व प्रथम पदवी व पदव्युत्तर अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना बोलवावे व त्यांची राहिलेली शिकवणी सुरु करावी. जेणेकरून तुलनेने कमी असलेले अंतिम वर्षातील विद्यार्थी संख्या लक्षात घेता त्याचा सार्वजनिक व्यवस्थेवरील ताण कमी होऊन परिस्थिती हाताळण्यासाठी मदत होईल.

९) अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास व निकाला येण्यास लागणारा ३० ते ४५ दिवसांचा वेळ व सध्याची न भूतो न भविष्यती परिस्थिती लक्षात घेता प्रथम व द्वितीय वर्षाप्रमाणे सध्याच्या सत्राच्या अंतिम वर्षाच्या अंतर्गत प्रात्यक्षिक व लेखी या सर्व परीक्षा विद्यार्थी शिकत असलेल्या त्याच महाविद्यालयात घेण्यात येऊन त्या तिथेच तपासणीची योजना व्हावी, जेणेकरून परीक्षा व निकाल वेळेत येण्यास मदत होईल सोबत कोरोना संसर्गाचा धोका कमी उद्भवेल यात परीक्षा प्रश्नपत्रिका नेहमीप्रमाणे विद्यापीठाने तयार करावीत.

१०) संख्येने अधिक असणारी प्रथम व द्वीतीय वर्ष विद्यार्थ्यांची परीक्षा काही ठिकाणी सुरू झालेली असली, तरी विद्यार्थ्यांचे आरोग्य हित बघता राज्यात सरसकट २० मे नंतर परीक्षा सुरू करावी, कारण तोपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव ही थांबेल अशी अपेक्षा आहे. तसेच राज्यातील सर्व सार्वजनिक यंत्रणा या आपल्या पूर्ण क्षमतेने कार्य करण्यास सक्षम होत असतील त्यामुळे त्याचा विद्यापीठांवर ताण ही येणार नाही.

११) प्रथम व द्वितीय वर्ष परीक्षा या ५० गुणांच्या घेवून त्यांचे १०० गुणांमध्ये रुपांतर करावे. अशा परीक्षा पॅटर्न मुळे परीक्षा कमी दिवसात व वेळेत होतील व त्याचा निकाल ही लवकर लावण्यास मदत होईल.

१२) दूर व मुक्त विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या लक्षात घेता राज्याच्या परीक्षांचे वेळापत्रक बनविताना अन्य सामान्य परीक्षा प्रमाणे त्यांचाही विचार होऊन त्याही वेळेत घेण्यात याव्यात.

१३) जून महिन्यापर्यंत सर्व परीक्षा पूर्ण झाल्यानंतर जुलै मध्ये निकाल येवून पुढील शैक्षणिक वर्ष प्रवेश प्रक्रिया जुलै महिन्याच्या मध्यापासून सुरू करता येईल व पुढील शैक्षणिक वर्ष ऑगस्ट मध्ये सुरू करण्यास अडचण येणार नाही.

१४) सदर धोरणा नंतर पुढील शैक्षणिक वर्षात शिकवणीचे दिवस कमी होतील, त्यामुळे पुढील शैक्षणिक सत्रातील सुट्टी कमी करून ते दिवस भरून काढण्याची योजना करता येईल.

१५) मुंबई परिसरे, पुणे, नागपूर सारख्या अति संसर्गित असलेली शहरे व जिल्ह्यातील लॉकडाउन ३ मे नंतर ही वाढला तर विद्यार्थ्यांच्या आरोग्य हित सर्वोतोपरी समोर ठेऊन या ठिकाणांच्या परीक्षा थेट जून महिन्यातच घेण्यात याव्यात.

या सूचनांचा विचार करून राज्यातील पुढील परीक्षा धोरण ठरवावे अशा प्रकारचे निवेदन अभाविपच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांना देण्यात आले असल्याचे प्रदेश मंत्री श्री. स्वप्नील बेंगडे यांनी सांगितले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा