राजगुरूनगर : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देश ठप्प झाला आहे. शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग यामुळे अनेक गरीब कुटुंबाला याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. खेड तालुक्यात अनेक ठाकरवाड्या वस्त्या आहेत. या ठिकाणी असलेल्या कुटुंबांचे हातावर पोट असल्याने या कुटुंबासाठी आता वनविभाग धावून आले आहे.
जुन्नर वन विभाग, खेड वन परिक्षेत्राने एक सामाजिक बांधिलकी जोपासून खेड तालुक्यातील वेताळे ठाकरवाडी येथे ४८ कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे .
सोशल डिस्टनस पाळत हे वाटप करण्यात आले असून ठाकरवाडी मधील अनेक कुटुंबांचा लॉकडाऊन च्या काळात रोजगार बंद झाला आहे. त्यामुळे त्या कुटुंबांच्या अडचणी मध्ये मोठ्या प्रमाणत वाढ होत आहे. हीच बाब लक्षात घेऊन खेड वन परीक्षेत्रातील वन क्षेत्रपाल आशुतोष शेंगडे यांच्या टीमने सुमारे ४८ कुटुंबांना गहू, तांदूळ,तेल, डाळ या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.
वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी वन विभागातील अधिकारी व कर्मचारी हे दिवसरात्र काम करत असताना आता सामाजिक बांधिलकी जपत कोरोनावर मात करण्यासाठी ठाकरवाडीतील अनेक कुटूंबांना मदत करत आहेत. याचबरोबर जिल्हा परिषद, महसूल विभाग त्याबरोबर अनेक संस्था व दानशूर व्यक्ती तालुक्यात अन्नधान्य वाटप करून कोरोनाच्या लढाईचा सामना करीत आहे. यामुळे या लॉकडाऊनच्या कालावधीत अनेक गरीब कुटुंबांना मदतीचा हात मिळाला आहे आणि तो ही गरजेच्या वेळी.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सुनिल थिगळे