१६ मे नंतर देशात करोना संपणार ?

नवी दिल्ली, २७ एप्रिल २०२०: देशात सर्वत्र कोरोना चा हाहाकार माजला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या २७,८९२ वर पोचली आहे. तर बऱ्या झालेल्यांची संख्या ६,१८५ आहे. दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढत चाललेला असला तरी आता एक चांगली बातमी समोर आली आहे. १६ मेनंतर देशात एकही करोनाचा रुग्ण आढळणार नाही, असा दावा नीती आयोगाचे सदस्य आणि सरकारच्या वैद्यकीय व्यवस्थापन समितीचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी एका अभ्यासाद्वारे केला आहे.

लॉक डाऊन केल्यानंतर रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याचा वेग कमी झाला आहे. याआधी कोरोना रुग्णसंख्या दुपटीने वाढण्याचा वेग अधिक होता, परंतु तो वेग कमी होत आता दहा दिवसांवर आला आहे. यावरून अंदाज बांधत पॉल यांनी असे सांगितले आहे की १६ मेनंतर भारतात ‘कोव्हिड १९’चा रुग्ण आढळणार नाही. राष्ट्रीय साथरोगशास्त्र संस्थेच्या संशोधकांसह जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) काही प्रतिनिधींनी मांडलेल्या अभ्यासाद्वारे हा निष्कर्ष समोर आला आहे. यामुळे भारतीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

देशातील लॉक डाऊन तीन मे नंतरुन रद्द होणार आहे अशी चर्चा आहे. परंतू अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही. या अहवालानुसार तीन मेपासून रुग्णसंख्येत प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होईल. कदाचित दीड हजार रुग्ण रोज वाढतील. १२ मे रोजी ही संख्या एक हजारपर्यंत खाली येईल आणि १६ मेनंतर एकही नवा रुग्ण आढळणार नाही. पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी आम्ही त्यासाठी अधिकाधिक आयसीयू, व्हेंटिलेटर आणि इतर वैद्यकीय साहित्याची तरतूद करत आहोत, असे पॉल यांच्या समितीतील एका सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा