गुजरात, दि.२७ एप्रिल २०२० : भारतातील इतर राज्यांप्रमाणेच गुजरात राज्यामध्येही कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आणि आता या कोरोना विषाणूच्या बाधेमुळे मुळे काँगेसच्या एका ज्येष्ठ नेत्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
१५ एप्रिल २०२० रोजी त्यांची चाचणी करण्यात आल्यानंतर करोना झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना अहमदाबादमध्ये महापालिकेच्या एसव्हीपी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. मात्र उपचारादरम्यान रविवारी (दि.२६) त्यांचा मृत्यू झाला.
अहमदाबाद महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते बदरुद्दीन शेख असे त्यांचे नाव आहे. लॉक डाऊनच्या काळात ते विविध माध्यमातून गरजूंना मदत करण्याचे काम करत होते. मात्र ही मदत करत असताना त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांची दि.१५ एप्रिल रोजी त्यांची चाचणी करण्यात आली. त्या अहवालात त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते.
त्यानंतर बद्रुद्दीन यांना महापालिकेच्या एसव्हीपी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ११ दिवसांपासून उपचार घेत असलेल्या शेख यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं होते. मात्र रविवारी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर ह्रदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर