नवी दिल्ली, २७ एप्रिल २०२०: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) सोमवारी म्यूच्युअल फंडांना ५०,००० कोटी रुपयांची तरलता आधार जाहीर केला. आजपासून सुरू झालेल्या या विशेष लिक्विडिटी योजनेच्या माध्यमातून रिझर्व्ह बँक ९० दिवसांसाठी निश्चित रेपो दरावर रेपो ऑपरेशन सुरू करणार आहे.
रिझर्व्ह बँकेच्या या मदतीचा उपयोग गरजेनुसार करता येईल. या मदतीचा फायदा घेण्यासाठी बँका सोमवार ते शुक्रवार या कालावधीत बिड सादर करू शकतात असे आरबीआयने म्हटले आहे. म्यूच्युअल फंडाच्या गरजा भागविण्यासाठी या मदती खाली मिळणाऱ्या पैशांचा उपयोग बँका करतील.
या पैशांसह म्यूच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट कॉर्पोरेट बॉन्ड्स, व्यावसायिक कागदपत्रे, डिबेंचर्स आणि ठेवींचे प्रमाणपत्रे बँकांना खरेदी करता येतील. फ्रँकलिन टेंपल्टनने आपले सहा क्रेडिट निधी बंद करण्याच्या निर्णयानंतर आरबीआयने ही विशेष मदत सुरू केली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या या कारवाईनंतर गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढेल, असे आयसीआयसीआय प्रू म्यूच्युअल फंडाचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निमेश शाह यांनी सांगितले. ते म्हणाले, “लोकांना त्यांचा पोर्टफोलिओ चांगल्या प्रतीचा हवा आहे. जर पोर्टफोलिओमध्ये गुणवत्ता नसेल तर तरलता येणार नाही. रिझर्व्ह बँकेच्या प्रयत्नांमुळे आत्मविश्वास वाढेल.”
न्यूज अनकट प्रतिनिधी