विकृत भावनेच्या पत्रकारितेला थारा नाही: बाळासाहेब शिवरकर

17

हडपसर, २९ एप्रिल २०२० : अर्णव गोस्वामी नावाच्या पत्रकाराने पालघर हत्या प्रकरणांमध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर व्यक्तिगत चारित्र्यहननाचे जे विकृत आरोप केले आहेत त्याचा हडपसर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत तीव्र निषेध करण्यात आला. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या निवासस्थानी काही मोजक्याच काँग्रेस कार्यकर्त्यांची यासंबंधात एक बैठक बोलावण्यात आली होती.
कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्ससिंगची योग्य ती खबरदारी घेत पार पडलेल्या या बैठकीत बोलताना बाळासाहेब शिवरकर म्हणाले की पत्रकारांना अभिव्यक्तिस्वातंत्र्य असले तरी एका राजकीय पक्षाच्या ज्येष्ठ महिला नेत्यावर असले विकृत आरोप कदापिही सहन केले जाणार नाहीत. अर्णव गोस्वामी यांच्यावर पाच राज्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुन्हे दाखल केले आहेत. हा विषय आता न्यायप्रविष्ट आहे. यातील एका गुन्ह्याविषयी काल मुंबईत अर्णव गोस्वामी यांची पोलिसांनी कसून चौकशी केली. महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या या कारवाईबद्दल राज्य सरकारचे अभिनंदनच केले पाहिजे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावरील असले बेफाम आरोप कोणताही काँग्रेस प्रेमी नागरिक आणि कार्यकर्ता सहन करणार नाही. अशा विकृत भावनेच्या पत्रकारितेलाही कोणी थारा देता कामा नये, असेही शिवरकर यांनी यावेळी नमूद केले. या बैठकीला मामा तुपे, विजय जाधव, प्रकाश पवार, अभिजित शिवरकर, अमित घुले इत्यादी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे