इंदापूर, दि.२९एप्रिल २०२०: इंदापूर तालुक्यामध्ये कोरोनाचा एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे जनतेने घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र सावधगिरी म्हणून जनतेने आणखी सतर्क राहण्याची गरज आहे. इंदापूर तालुका कोरोनामुक्त होण्यासाठी जनतेने सहकार्य करणे गरजेचे आहे, असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज (बुधवारी) केले.
केंद्र व राज्य सरकार दि.३ मे रोजी संपणाऱ्या लॉकडाऊनच्या कालावधीसंदर्भात लवकरच योग्य निर्णय घेईल,त्यामुळे सर्वांनी आणखी थोडा त्रास सहन करून लॉकडाऊनचे पालन करावे. इंदापूर तालुक्यातील अधिकारी वर्ग चांगले काम करीत आहे. तालुका प्रशासनास जनतेने सहकार्य करावे. जनतेने एकजुटीने व राजकारण बाजूला ठेऊन या कोरोना व्हायरस संकटाचा मुकाबला करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी पाटील म्हणाले की ,प्रत्येक गावी कोणी उपाशी राहणार नाही. याची जबाबदारीही कार्यकर्त्यांनी घ्यावी. तसेच केंद्र सरकारने दिलेले धान्य सर्व जनतेला वेळेवर मिळेल. याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे. लॉकडाऊन हा अनेक दिवस चालल्याने जनतेने संयम बाळगत सकारात्मक मानसिकता ठेवावी. केंद्र व राज्य सरकारच्या आदेशाचे पालन करावे.
इंदापूर तालुका हा कालपर्यंत कोरोना मुक्त होता. मात्र रुग्ण आढळून आल्याने काळजी वाढली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी एखाद्या नागरिकास कोरोना रोगसदृश लक्षणे जरी दिसून आल्यास संबंधीतांनी तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. यामध्ये अपराधीपणाची अथवा कमीपणाची भावना मनामध्ये कोणीही बाळगण्याची आवश्यकता नाही. उलट हे प्रशासनास सहकार्य करण्याचे व स्वतःच्या आरोग्यची काळजी घेण्याचे काम आहे. गर्दीमध्ये न जाता घरीच थांबणे व सोशल डिस्टनन्सिंग पाळणे हा सध्या एकमेव प्रभावी मार्ग कोरोनाला हरविण्याचा आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी “न्यूज अनकट” शी बोलताना सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे