पुणे, ३० एप्रिल २०२० : औंध येथील एम्स रुग्णालयामध्ये कोरोना संसर्गित रुग्ण सापडल्याने भीतीचे वातावरण होते. त्यानंतर या रुग्णाला पिंपरी चिंचवड येथील वाय सी एम रुग्णालयात हलविण्यात आले होते. या रुग्णाचे वय ८० होते व फिट आल्यामुळे त्याला एम्स मध्ये आणण्यात आले होते. असे तेथील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (आज ३० एप्रिल) न्यूज अनकट शी बोलताना सांगितले.
या घटने नंतर तब्बल ५८ वैद्यकीय कर्मचारी क्वारंटाईन केले गेले होते. यामध्ये अतिदक्षता विभागामधील आणि इतर कर्मचारी होते. या सर्व कर्मचाऱ्यांची चाचणी घेण्यात आली होती. याचा अहवाल काल रुग्णालयास मिळाला व सर्व चाचण्या नकारात्मक (निगेटिव्ह) आल्या. त्यामुळे या सर्वांना डी-क्वारंटाईन करण्यात आले आहे.
डॉ. आगाशे यांनी सांगितले की, सदर प्रकरणी आम्ही सर्व माहिती महानगरपालिकेला पुरवत होतो. कालचे रिपोर्ट देखील त्यांना पाठवण्यात आले होते. रिपोर्ट येईपर्यंत रुग्णालयाकडून सर्व माहिती नियमितपणे महानगरपालिकेला इमेल्स, फोन च्या माध्यमातून पुरवण्यात आली होती. त्यानंतर पुणे महानगरपालिकेने संबंधित कर्मचाऱ्यांना घरी जाण्याची परवानगी दिली आहे.
१४ दिवस क्वारंटाईन करण्याचे आदेश असताना हे कर्मचारी बाहेर का फिरत आहेत, असा औंध परिसरातील नागरिकांना प्रश्न पडला होता. या विषयी बोलताना डॉ. आगाशे म्हणाले की, नवीन गाईडलाईन नुसार काही बदल करण्यात आले आहेत. वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वैद्यकीय सेवा या अत्यावश्यक सेवा मध्ये मोडत आहेत. त्यामुळे असा निर्णय घेण्यात आला आहे.
दुसऱ्या टेस्ट विषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले की, सर्व ५८ रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तसेच कोणत्याही वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत, त्यामुळे त्यांची दुसरी टेस्ट घेतली नाही. त्यासाठी त्यांना गेले काही दिवस क्वारंटाईन ठेवण्यात आले होते. सरकारच्या आदेशानुसार सर्वांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
न्यूज अनकट च्या माध्यमातून त्यांनी जनतेला देखील आव्हान केलं आहे की संबंधित कर्मचाऱ्यांकडून कोणताही धोका नागरिकांना नाही. त्यामुळे त्यांना त्रास देण्याचे टाळावे. आम्ही तुमच्यासाठीच काम करत आहोत. शासनाने देखील या बाबत जनजागृती करावी ज्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यां विषयी लोकांच्या मनात असलेली भीती कमी होईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे