“महाराष्ट्र दिन” हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. या दिनाला कामगार दिनही संबोधले जाते. १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सर्वांना सार्वजनिक सुट्टी असते. या दिवशी विविध ठिकाणी शासकीय ध्वजारोहण करण्यात येते. या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येते. मात्र यावर्षी कोरोनाच्या महामारीने साध्या पद्धतीने ध्वजारोहण करण्यात आले.
२१ नोव्हेंबर १९५६ या दिवशी फ्लोरा फाउंटन परिसरात तणावाचे वातावरण होते. कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले. त्यामुळे मराठी माणसांचा राग अनावर झाला. राज्यभरात छोट्या मोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध करण्यात येत होता. कामगारांच्या या संघटनांमुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटन समोर असलेल्या चौकात काढण्याचे नियोजन झाले.
त्यामुळे प्रचंड मोठा जनसमुदाय एका बाजूने चर्चगेटकडून व दुसरा बोरीबंदरकडून मोठ्या आवाजात घोषणा देत फ्लोरा फाउंटन परिसरात जमला. मात्र हा मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. नंतर या संघटित सत्याग्रहींमुळे पोलिसांचे मोर्चाला तोडण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले. त्यामुळे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी पोलिसांना गोळीबाराचा आदेश दिले. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जवळपास १०६ आंदोलक हुतात्मे झाले.
या हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर इ.स. १९६५ मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली. तेव्हापासून राज्यात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येऊ लागला.
न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर