लोणी काळभोर, दि.१ मे २०२०: कदमवाक वस्ती परिसरातील मृत महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्या महिलेच्या संपर्कातील २७ जण तपासणीसाठी पुण्याला हलवण्यात आले आहेत.
कदमवाक वस्ती हद्दीतील माळवाडी येथील एका महिलेला मागील काही दिवसांपासुन मूत्राशयाचा त्रास सुरु होता व बुधवारी (दि. २९)रोजी त्या महिलेला दुपारी हडपसर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. संबधित महिलेवर उपचार चालू असताना गुरुवारी मध्यरात्री त्या महिलेचा मृत्यू झाला. मृत्युनंतर खासगी रुग्णालय प्रशासनाने संबधित महिलेची कोरोना टेस्ट केली व वरील धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
माळवाडी येथील मृत्युमखी पडलेली महिला कोरोना बाधित असल्याचे समोर येताच कदमवाक वस्ती ग्रामपंचायत प्रशासन व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या माळवाडी येथील तब्बल सत्तावीस जणांना तातडीने माळवाडी परिसरातील नागरिकांपासून वेगळे केले. व त्यांची कोरोनाची तपासणी करण्यासाठी सर्वांना पुणे येथील नवले रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, तीन दिवसांपूर्वी माळवाडी परिसरातील घरोघरी जाऊन माहिती घेतली होती. त्यावेळी महिलेच्या नातेवाईकांनी महिला आजारी असल्याबाबत कसलीही माहिती दिली नव्हती. व तसेच संबधित महिलेच्या संपर्कात आणखी कोणी आले का याची माहिती घेण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. असे अधिकाऱ्यांनी “न्यूज अनकट” शी बोलताना सांगितले.
अनकट न्यूज प्रतिनिधी -ज्ञानेश्वर शिंदे