पुणे, दि.४ मे २०२० : राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दारु विक्रीला सरकारने सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे आज (सोमवार) पासून तिन्ही झोनमध्ये दारूची दुकाने उघडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुण्यात सकाळपासूनच मद्यप्रेमींनी वाईन शॉप बाहेर गर्दी केली आहे. मात्र सरकारकडून पुणे जिल्ह्यात कोणतीही दारूची दुकाने उघडण्यास परवानगी दिलेली नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अनेकजण तीन चार तासांपासून रांगेत तात्कळत उभे आहेत. मात्र पुणे शहरासह जिल्ह्यात दारुची दुकान अद्याप उघडणार नसल्याचे पोलिसांनी सांगताच अनेक मद्यप्रेमींनी घरचा रस्ता धरावा लागला.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात घोषित करण्यात आलेला लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे.
पुण्यात सकाळी ६ वाजल्यापासूनच काही मद्यप्रेमी वाईन शॉपसमोर जमा झाले होते. तोंडाला मास्क, हातात पिशव्या आणि पैसे घेऊन अनेकजण भर उन्हात उभे होते. अनेक दिवसानंतर दारु मिळणार असल्याने त्यांचा आनंद शिगेला पोहोचला होता. रेशन धान्य दुकानासमोर ज्याप्रमाणे कूपन घेण्यासाठी अनेकांनी रांगा लावल्या होत्या, तशीच रांग दारुसाठी लागली होती.
मात्र प्रशासनाकडून कोणताही आदेश न आल्यानं वाईन शॉप सुरु झाले नाही. त्यामुळे तीन ते चार तास रांगेत उभे राहिल्यानंतर मद्य प्रेमींची मोठी निराशा झाल्याचे चित्र पहायला मिळाले. अखेर वाईन शॉप समोरील गर्दी हटवण्यासाठी पोलीस वाईन शॉप समोर दाखल झाल्याचे चित्र पहायला मिळाले.
पुणे जिल्ह्यात दारु बंदच राहणार
दरम्यान पुणे जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकाने सुरु करण्यासंदर्भात आतापर्यंत प्रशासनाचा कोणताच निर्णय झालेला नाही. मद्य विक्री दुकानासंदर्भात नव्याने कोणताही आदेश काढलेला नाही, दुकाने बंदच राहतील. असे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर