महाराष्ट्राला कोरोना संकटातून एकजुटीने बाहेर काढू: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि ७ मे २०२० : राज्यावर असलेले कोरोनाचे संकट घालविण्यासाठी विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेतली जाईल. तसेच आपण सर्वजण एकजुटीतून आपण हे संकट दूर करू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

मुंबई येथे विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बैठकीत ठाकरे बोलत होते.

यावेळी बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, मनसे प्रमुख राज ठाकरे मंत्रालयातून तर मंत्री एकनाथ शिंदे ठाण्याहून तर इतर नेते राज्याच्या विविध जिल्ह्यातून सहभागी झाले होते

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, आज कोरोनाशी लढत असतांना आपल्याला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. ही अभूतपूर्व परिस्थिती असल्याने केवळ आपले राज्यच नव्हे तर देश आणि जगही यात होरपळले आहे. माझे आपल्याशी मधून मधून दूरध्वनीवरून बोलणे सुरूच असते. आपल्या सुचना मी ऐकत असतो, माध्यमांतून वाचत असतो. त्या योग्य असतील तर लगेच प्रशासनाला कळवीत असतो. केंद्र सरकार सुद्धा यात आपल्याला खूप सहकार्य करीत आहे. मग ते पंतप्रधान, गृहमंत्री, असो किंवा
केंद्रीय आरोग्य मंत्री असो. पंतप्रधान मार्गदर्शनासाठी सहजपणे उपलब्ध असतात. तसेच आत्तापर्यंत आम्हा मुख्यमंत्र्यांची आणि त्यांची व्हीसीद्वारे बैठकही झाली आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपण प्रसंगी टीका करीत असाल पण त्यात आपला उद्देश उणीवा निदर्शनास आणून शासनाला सुचना करणे असा असतो.

आपण केलेल्या कडक लॉकडाऊनमुळे एप्रिल महिन्यात रुग्ण संख्या वाढली नाही. मात्र मेअखेरीपर्यंत आपल्याला अजून काळजी घ्यायची आहे. मुंबईत रुग्णसंख्या वाढते आहे मात्र बीकेसी, वरळी , रेसकोर्स अशा ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणावर विलगीकरण केंद्रे उभारली आहेत. आपण चाचण्यांची संख्याही खूप वाढवली आहे. व्हेंटीलेटर्सपेक्षा ऑक्सिजनची गरज आहे. परराज्यातील नागरीकानाही पुरेशी काळजी घेऊन आम्ही पाठवत आहोत. राज्यांतर्गत लोकांना प्रवासाची परवानगी देण्यापूर्वी व्यवस्थित काळजी घेण्यात येईल जेणे करून ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये धोका वाढणार नाही असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

केंद्रीय संस्था , लष्कर, पोर्ट ट्रस्ट, यांना आम्ही आयसीयु बेड्स उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. मुंबईतून देखील परराज्यातील कामगार नेण्यासाठी रेल्वे सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे अशी माहितीही त्यांनी दिली. मालेगाव व औरंगाबाद येथे कंटेनमेंट झोन्स मध्ये अधिक शिस्त ठेवण्याची गरज आहे, तेथील लोक प्रतिनिधीनी सहकार्य करावे अशी विनंती त्यांनी यावेळी केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा