इगतपुरी ते कसारा दरम्यान परप्रांतीय नागरिकांची गर्दी

14

नाशिक, दि.९ मे २०२०: सध्या राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईसह उपनगरातील परप्रांतीय नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून पायी आपल्या गावाकडे जात आहे. हे चित्र गेल्या काही दिवसात अधिकच गडद आणि गर्दीचं होऊ लागलं आहे.

मुंबई – आग्रा महामार्गावर असलेली ही लोकांची गर्दी पाहिली तर पायी वारी चालल्याचा भास होतो. पण ही गर्दी मुंबई सोडून जाणाऱ्या परप्रांतीय नागरिकांची. गावी जाण्यासाठी वाहनाची सोय नसल्याने हे नागरिक पायी आपल्या गावाकडे निघाले आहे.

इगतपुरी ते कसारा दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा हे परप्रांतीय नागरिक हजारोंच्या संख्येने आपापल्या गावी जाण्यासाठी आपलं ओझं आपल्याच डोक्यावर घेऊन जात असल्याचे पहायला मिळत आहे. यात काही महिलांच्या कडेवर, खांद्यावर लहान लहान मुलं आहेत. त्यामुळे घराची ओढ लागलेल्या या नागरिकांना ना उन्हाची तमा आहे ना पाण्याची.

इगतपुरी ते कसारा दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला अशीच पायी जाणाऱ्या लोकांची गर्दी दिसते आहे. हे प्रमाण मोठ्या प्रमाणांवर असल्याने जवळपास पडघा तोल नाक्यापर्यंत अशीच पायी जाणाऱ्या लोकांची गर्दी दिसून येत आहे.

यावर राज्यसरकार, जिल्हा प्रशासनाने त्वरित तोडगा काढण्याची गरज आहे अन्यथा औरंगाबाद जालना लोहमार्गावर झालेली दुर्घटना अशा राष्ट्रीय महामार्गावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: