नवी दिल्ली, दि. ११ मे २०२०: रसायन आणि खते मंत्रालयांतर्गत नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीच्या उपक्रमाने एप्रिल २०२० मध्ये खत विक्रीत ७१% वाढ नोंदवली आहे. एप्रिलमध्ये कोविड-१९ लॉकडाऊनमुळे देशात कडक निर्बंध असूनही कंपनीने मागील वर्षीच्या याच कालावधीतील २.१२ लाख मेट्रिक टनच्या तुलनेत एप्रिल २०२० मध्ये ३.६२ लाख मेट्रिक टन खत विक्री नोंदवली.
लॉकडाऊनमुळे कंपनीला वाहतुकीच्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, मात्र तरीही या महत्त्वपूर्ण काळात शेतकऱ्यांना खते उपलब्ध करून देण्यात त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. एनएफएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मनोज मिश्रा यांनी एप्रिल २०२० महिन्यात विक्रीमध्ये ही सर्वाधिक वाढ साध्य केल्याबद्दल विपणन संघाच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
एनएफएल पंजाबमध्ये नांगल आणि भटिंडा, हरियाणामध्ये पानिपत आणि मध्य प्रदेशात विजापूर येथे दोन अशा एकूण पाच कारखान्यांमध्ये यूरियाची निर्मिती करते. यूरियाची उत्पादन क्षमता ३५.३८ लाख मे. टन इतकी आहे. या सर्व उत्पादनांसह कंपनीने २०१८-२० मध्ये ५७ लाख मेट्रिक टन इतकी सर्वाधिक विक्री सलग पाचव्यांदा नोंदवली. कठीण काळात या कारखान्यांमध्ये सर्वोत्कृष्ट कामकाज कायम राखणे ही विशेषत: देशातील शेतकरी वर्गासाठी सरकारची वचनबद्धता पूर्ण करण्याच्या दृष्टीने एक मोठी यशोगाथा आहे.
कोविड-१९ विरोधातील लढ्यात सरकारच्या प्रयत्नांना पाठबळ देण्याव्यतिरिक्त, एनएफएल कर्मचार्यांनी एक दिवसाच्या वेतनाचे ८८ लाख रुपये पीएम केअर निधीसाठी दिलेच , मात्र त्याशिवाय कार्पोरेट सामाजिक दायित्व अंतर्गत ६३,९४ लाख रुपये पीएम केअर्स निधीसाठी दिले. अशा प्रकारे कंपनीने पीएम केअर्स निधीसाठी १.५२ कोटी रुपये योगदान दिले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी