पुणे, दि.१२ मे २०२० : पुणे जिल्हयात प्रवेश करणाऱ्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी आता बंधनकारक करण्यात आली आहे. शिवाय परराज्यात, इतर जिल्ह्यात अडकलेले नागरिक आता एसटी आणि रेल्वे सुरु झाल्याने पुण्यात परतू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
लॉकडाऊनमुळे परराज्यात, जिल्ह्यात अडकलेल्या स्थलांतरित मजूर, इतर नागरिक पुणे जिल्ह्यात परतत आहेत. हे नागरिक बस, रेल्वे तसेच खाजगी वाहनाने प्रवास करुन पुणे जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागात दाखल होत आहेत. त्यामुळे कोरोना संशयित रुग्ण प्रवास करुन आलेल्या प्रवाशांमधून आढळण्याची शक्यता आहे.
यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे, विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देता त्याला तात्काळ रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवास करुन आलेल्या सर्व प्रवाशांची तालुक्यांच्या, गावांच्या सीमेवरच वैद्यकीय तपासणी करणे अनिवार्य असेल, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे पुण्यात येणाऱ्या प्रत्येकाची आता वैद्यकीय तपासणी करणे अनिवार्य करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर