मुंबई, दि.१२ मे २०२०: पहिली ते सहावीपर्यंत सर्व माध्यमांच्या शाळांतून मराठी भाषा विषय शिकवणे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांपासून सक्तीचे करण्यात आले आहे. अशी माहिती मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
मुंबईत शिक्षण आयुक्त विश्वास सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सोमवारी बैठक घेण्यात आली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी बैठकीत झालेल्या चर्चेनुसार महाराष्ट्रात मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठी भाषा अनिवार्य करणारा कायदा एकमताने दोन्ही सभागृहांकडून मंजूर करण्यात आला आहे. या कायद्याची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात येणार आहे, असं मराठी भाषा विभागमंत्री सुभाष देसाई व शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
बैठकीत बालभारतीतर्फे राजीव पाटोळ यांनी अनिवार्य मराठीसाठी वर्गवार अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके यांच्या पूर्वतयारीचं सादरीकरण केले. तसेच शिक्षण विभागाने सर्व अभ्यासक्रमांच्या शाळांसाठी मराठी सक्तीने शिकविण्यासाठी केलेल्या पूर्वतयारीबद्दल मराठी भाषा मंत्री देसाई यांनी शालेय शिक्षणमंत्री आणि अधिकाऱ्यांचे आभार यावेळी मानले.
न्युज अनकट प्रतिनिधी: