लॉकडाऊनमध्ये अडचणीत आलेल्या रिक्षाचालकांचा बारामतीत ठिय्या

बारामती, दि.१३ मे २०२० : लॉकडाऊनमुळे ४७ दिवसांपासुन रिक्षा व्यवसाय बंद आहे. त्यामुळे रिक्षाचालक अडचणीत आले आहेत. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली
आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बारामती शहरातील रिक्षा चालकांनी आज (बुधवारी) येथील प्रशासन भवनसमोर सोशल डिस्टन्सची काळजी घेत ठिय्या आंदोलन केले.

रिक्षावरील कर्जास डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ द्या, रिक्षाच्या कर्जावरील व्याज माफ करा. ‘ घरी संपलाय किराणा आता तरी मदत कराना’ , ‘आम्ही प्रशासनाचे सर्व नियम पाळले. त्यामुळे आम्हाला मदतीतून टाळले’ , आदी घोषणाफलक हाती घेत रिक्षाचालकांनी प्रशासनाचे लक्ष  वेधले.

माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त प्रशांत  सातव यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र मानवी हक्क संघटनेचे शहराध्यक्ष मुनीर तांबोळी यांच्या सहकार्यार्ने उपविभागीय अधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले.
मार्च ते डिसेंबर २०२० पर्यंत नोंदणीकृत रिक्षा चालकांना परिवहन विभागामार्फत १० हजार अर्थसहाय्य मिळावे. पुढील २ वर्षापर्यंत रिक्षासंबंधी पासिंग, इन्श्युरन्स आदी सरकारने माफ करावे ,तसेच दरवर्ष पासिंग व इन्शुरन्सची १० ते १२ हजार रुपये प्रत्येक रिक्षा चालक जमा करतो त्या मोबदल्यात इन्श्युरन्सचा कोणताही मोबदला मिळत नाही. चालकाने पहिल्या वर्षी क्लेम केला नाही ,तर  पुढील वर्षी इन्श्युरन्स घेऊ नये, म्हणजे १ वर्षाच्या इन्श्युरन्समध्ये २ वर्षाचे इन्श्युरन्स संरक्षण मिळावे.

लॉकडाऊन नंतर रिक्षा सुरू झालेनंतर सरकारने उच्च प्रतीचे मास्क, हॅण्डक्लोज, सॅनिटायझर व इतर आवश्यक सुविधा पुरवाव्यात. महिन्यातून दोन वेळा मोफत आरोग्य तपासणी करण्यात यावी. चालक मालकांना सरकारने २० लाखाचा विमा व ५ लाख रूपयांचा वैद्यकीय विमा काढावा, पुढील दोन वर्षांची मुलांची शैक्षणिक फी सरकारने माफ करावी, रिक्षा चालक व मालकांच्या कुटुंबियांची उपासमारी थांबविण्यासाठी दोन महिन्यांचा किराणा सामानाचे वाटप त्वरीत करण्यात यावे. रिक्षावर असणा-या कर्जाचा मासिक हप्त्यास ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी व व्याज माफ करण्यात यावे. अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनावर भारतरत्न प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर अ‍ॅटो रिक्षा संघटना बारामतीचे अध्यक्ष आण्णा समिंदर, सचिव सागर सोनवणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अ‍ॅटो  रिक्षा संघटना तीन हत्ती चौक बारामतीचे अध्यक्ष दादा शिंदे व सचिव सखाराम सोनवणे यांनी सह्या केल्या आहेत. यावेळी अजित साळुंके, रमेश जाधव, शिवाजी जाधव, सागर जाधव आदी उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा