सोलापूर, दि.१४ मे २०२० : अकलूज-टेंभुर्णी महामार्ग काँक्रिटीकरणाचे काम पोलिस बंदोबस्तात सुरू असताना ठेकेदाराच्या कामगारांना व दोन पोलिसांना दमदाटी, शिवीगाळ करून काठीने व दगडाने मारहाण करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.१३) रोजी दुपारी घडली आहे. याप्रकरणी माढा तालुक्यातील शेवरे येथील १८ जणांविरुद्ध टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यातील १० जणांना अटक केली आहे. माढा न्यायालयसमोर हजर केले असता वरिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी ए. आर. सय्यद यांनी संशयित आरोपींना २७ मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, अकलूज-टेंभुर्णी रस्ता काँक्रिटीकरणाचे ठेकेदाराने शुल्क भरून पोलिस बंदोबस्तात काम सुरू केले होते. मंगळवारी (दि.१३) रोजी दुपारी११.४५ च्या सुमारास माढा तालुक्यातील शेवरे येथील विक्रम गायकवाड वय ३०, ब्रह्मदेव मस्के वय ४०, मधुकर मस्के वय ३३, गोरख मस्के वय २२, सुधीर मस्के वय २५, हरिदास मस्के वय ३५, तुषार मस्के वय ३३, बाळासाहेब मस्के वय ३३, सुधर्म मस्के वय ३५, विकास मस्के वय ४२, आनंद मस्के वय २२, अमित मस्के वय ३६, अंकित मस्के वय ३७, सुधीर मस्के वय ३३, शुभम मस्के वय २४, धनाजी मस्के वय ३५, राहुल सुतार वय ३५, किशोर सुतार वय ३३ यांनी अकलूज-टेंभुर्णी महामार्ग काँक्रिटीकरणाचे काम चालू असताना जमाव जमवून संचारबंदी आदेशाचा भंग करत पोलिस बंदोबस्तात सुरू असलेले काम बंद पाडले. तसेच ठेकेदाराच्या कामगारांना मारहाण केली. यावेळी बंदोबस्तास असलेले पोलिस कर्मचारी संजय भानवसे यांना जमलेली मंडळी बाजूला करत असताना ब्रह्मदेव मस्के यांनी काठीने मारहाण केली. तर पोलिस कॉन्स्टेबल सचिन साळुके यांना मधुकर तुळशीराम मस्के व विक्रम शिवाजी गायकवाड या दोघांनी बाजूला पडलेल्या दगडाने पाठीत मारहाण केली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: