नवी दिल्ली, दि. १६ मे २०२०: लेफ्टनंट जनरल पीएस राजेश्वर, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी, कमांडर इन चीफ ए अँड एन कमांड यांनी पोर्ट ब्लेअर येथे आयएनएलसीयू एल५७ जहाज भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू केले. भारतीय नौदलात सामील होणारे आयएनएलसीयू एल ५७ (INLCU L57) लँडिंग क्राफ्ट यूटिलिटी (LCU) हे एमके- IV वर्गातील सातवे जहाज आहे. हे पूर्णतः स्वदेशी बनावटीचे असून कोलकाताच्या मेसर्स गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स (जीआरएसई) यांनी या जहाजाचे डिझाइन आणि उत्पादन केले आहे. आयएनएलसीयू एल५७ नौदलाच्या सेवेत रुजू करणे हे स्वदेशी डिझाईन आणि जहाज निर्मिती क्षमतेचे आणखी एक उदाहरण आहे.
एलसीयू एमके- IV हे जहाज एक उभयचर जहाज आहे ज्यामध्ये प्रमुख युद्ध रणगाडे, सशस्त्र वाहने, सैन्य आणि उपकरणे जहाजापासून किनाऱ्यावर तैनात करण्याच्या मुख्य भूमिका सक्षम पणे बजावली जाईल अशाप्रकारे त्याचे डिझाईन तयार करण्यात आले आहे. अंदमान आणि निकोबार कमांडमध्ये असणारी ही जहाजे समुद्रकिनारी मोहीम, शोध आणि बचाव, आपत्ती निवारण कार्य, पुरवठा आणि दुर्गम बेटांमधून निर्वासन अशा विविध कामांसाठी तैनात करता येतील.
लेफ्टनंट कमांडर हर्षवर्धन वेणुगोपाल यांच्या कमांडखालील या जहाजात ५ अधिकारी आणि ४५ नौदल कर्मचारी असून हे जहाज १६० अतिरिक्त सैनिक घेऊन जाण्यास सक्षम आहे. हे जहाज ८३० टन विस्थापनासह मुख्य युद्ध रणगाडा अर्जुन, टी ७२ यासारख्या विविध प्रकारच्या युद्ध उपकरणांसह आणि इतर वाहने नेण्यास सक्षम आहे. हे जहाज इंटिग्रेटेड ब्रिज सिस्टम (आयबीएस) आणि इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टम (आयपीएमएस) यासारख्या अत्याधुनिक उपकरणे आणि प्रगत प्रणालींसह सुसज्ज आहे.
या श्रेणीतील शेवटचे जहाज मेसर्स जीआरएसई, कोलकाता येथे बांधकामांच्या प्रगत टप्प्यात पोहचले असून या वर्षाच्या अखेरीस हे नौदलाच्या सेवेत रुजू होणे अपेक्षित आहे. पंतप्रधानांच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेच्या अनुषंगाने या जहाजांचा समावेश देशाच्या सागरी सुरक्षेच्या गरजांना हातभार लावेल असा अंदाज आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी