लोणी काळभोर, दि.१६ मे २०२० : नवीन कॅनलच्या कालव्याच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या आपल्या सात वर्षीय मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईला जीव गमवावा लागला, तर वडिल पाण्यात बुडून बेपत्ता झाल्याची घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे शनिवारी (ता. १६ ) रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घडली.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत सोनी कश्यप (वय ३८) रा. सध्या कुंजीरवाडी, ता. हवेली, मूळगाव गौसगाव जि. हरदोई, उत्तर प्रदेश यांचा मृत्यू झाला. तर अशोक कश्यप ( वय ४०) हे पाण्यात बुडाले आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. अशोक व सोनी हे जोडपे उत्तर प्रदेशहून सहा महिन्यांपूर्वी दोन मुली व दोन मुले, अशा चार मुलांना घेऊन कुंजीरवाडी परिसरात कामासाठी आले होते.
या जोडप्याला तीन महिन्यांपूर्वी अतुल जवळकर, यांच्या कुंजीरवाडी येथील “गौरी नर्सरी’ त बिगारी म्हणून कामही मिळाले होते. महिनाभर काम करताच कोरोनाचे कारण दाखवून अशोक यांनी नर्सरीमधील काम थांबवले होते. तसेच, त्यांनी गावी जाण्यासाठी तीनच दिवसांपूर्वी तलाठी कार्यालयात नाव ही नोंदवले होते.
अशोक व सोनी हे दोघेजण काम नसल्याने चारही मुलांना घेऊन शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास नवीन कॅनलच्या कालव्यावर गेले होते. व तीन मुले कालव्याच्या भरावाजवळ खेळत होती. रणजित हा सात वर्षीय मुलगा कालव्यात पोहण्यासाठी उतरला होता.
आळंदी म्हातोबाची गावाकडे जाणाऱ्या रस्त्यापासून सोरतापवाडी गावाकडे पाचशे मीटर अंतरावर कालव्यातील पाण्याला वेग मिळावा, यासाठी पाटबंधारे विभागाने कालव्याची रुंदी दगडी बांधकाम करून कमी केलेली आहे. रणजित हा पोहण्याच्या नादात या दगडी बांधकामाजवळ आल्याने कालव्यात वाहून जाऊ लागला. त्याला वाचविण्यासाठी मुलाच्या आईने पाण्यात उडी मारली ते पाहून सोनी यांचे पती अशोक यांनी ही पाण्यात उडी मारली. मात्र तिघेही दगडी भिंतीतून सोरतापवाडीच्या बाजूकडे वाहून गेले आणि दगडी भिंतींच्या प्रवाहामुळे निर्माण झालेल्या पाण्याच्या भोव-यात अडकले. अशोक, सोनी व रणजित हे कालव्याच्या पाण्यात बुडत असल्याचे पाहून कालव्यावर खेळत असलेल्या तीनही मुलांनी आरडा-ओरडा करण्यास सुरुवात केली. व तो आवाज ऐकून सुनील चौधरी, चुनका वर्मा, व दादा निळकंठ कुंजीर, या तिघांनी कालव्याच्या भरावाकडे धाव घेतली. यात रणजित हा कालव्याच्या एका बाजूला आल्याने तत्काळ हाती लागला, तर सोनी यांना दहा मिनिटाच्या प्रयत्नानंतर पाण्याच्या भोवऱ्यातुन बाहेर काढले. मात्र त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अशोक यांनाही घटनास्थळी आलेल्या नागरिक व पोलिस कर्मचा-यांनी शोधण्याचा प्रयत्न केला.
मात्र अद्याप ते सापडले नाहीत, लोणी काळभोर पोलिस, स्थानिक नागरिक व अग्निशामक दलाचे जवान अशोक यांचा शोध घेत आहेत. पुढील तपास लोणी काळभोर पोलिस स्टेशन करत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे