मुंबई, दि.१८ मे २०२०: मराठी साहित्यात महत्वाचे योगदान असणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व तसेच गूढकथा लेखक, नाटककार, चित्रपट दिग्दर्शक, चित्रकार, विचारवंत, रत्नाकर रामकृष्ण मतकरी (वय ८१) यांचे रविवारी (दि.१७) रोजी रात्री मुंबईत निधन झाले. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते.
रत्नाकर मतकरी यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९३८ रोजी मुंबईत झाला. १९९५ मध्ये म्हणजे त्यांच्या वयाच्या सतराव्या वर्षी, रत्नाकर मतकरी यांची एकांकिका ‘वेडी माणसं’ ही, आकाशवाणी मुंबई केंद्रावरून ध्वनिक्षेपित झाली. तेव्हापासून अगदी गेल्या काही दिवसांपर्यंत अव्याहतपणे त्यांचे लेखन चालू होते. वयाची ८० वर्षे ओलांडल्यानंतरही त्यांचे नवे लिखाण वाचावयास मिळत होते.
नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक लेख अशा नानाविध साहित्य प्रकारात त्यांनी दर्जेदार लेखन केले होते. मराठी रंगभूमीवरील नव्या पर्वाच्या जडण-घडणीतले एक शिल्पकार, असे त्यांचे सार्थपणे वर्णन करता येईल. व्यावसायिक, प्रायोगिक आणि बालनाट्य अशी रंगभूमीची तिन्ही दालने हे त्यांचे कार्यक्षेत्र राहिले. तिथली त्यांची कामगिरी, नाट्यलेखन, दिग्दर्शन, नेपथ्य आणि संगीत यांचे संकल्पन, वेशभूषा रेखाटन, अभिनय, तसेच निर्मिती अशी सर्वांगीण स्वरूपाची आहे. ‘बालनाट्य’, ‘सूत्रधार’ आणि ‘महाद्वार’ या आपल्या नाट्य संस्थांच्या द्वारे त्यांनी, प्रतिभा मतकरी या कलावंत पत्नीच्या साहाय्याने रंगभूमीच्या क्षेत्रात केलेले निरपेक्ष, निष्ठापूर्ण कार्य लक्षणीय आणि मोलाचे होते.
मतकरी यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. तथापि मराठी अन्य भाषांमध्ये रसिकांनी मतकरींच्या साहित्यावर जो लोभ केला. तो त्यांना मिळालेला सर्वाधिक मोलाचा पुरस्कार म्हणता येईल. त्यांची ‘दुभंग’, ‘अश्वमेध’, ‘माझं काय चुकलं?’, ‘जावई माझा भला’, ‘घर तिघांचं हवं!’ ‘खोल खोल पाणी’ ही नाटके नाट्यरसिकांच्या मनात कायम घर करून आहेत. ‘चार दिवस प्रेमाचे’ या संगीत नाटकाचे १०००हुन अधिक प्रयोग केले. आणि हिंदी व गुजराती भाषांमध्येही ते यशस्वी झाले. तसेच, अलिकडच्या ‘सुखान्त’ या नाटकाचे गुजराती रुपांतर ‘वारस’ हे ही अत्यंत यशस्वी ठरले.
मतकरी हे नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य अशा साहित्य प्रकारांत दर्जेदार लेखन करणारे साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकार देखील आहेत. त्यांनी महाराष्ट्रात बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवून, सुमारे तीस वर्षे पदरमोड करून बालनाट्यांची निर्मिती केली. झोपडपट्टीतीतील मुलांना त्यांनी ’नाटक’ शिकवले.
२००१ साली पुण्यामध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
न्युज अनकट प्रतिनिधी: