बाहेरुन शहरात येणाऱ्या नागरिकांबाबत नियमावली करा : अश्विनी चिंचवडे

पिंपरी, दि२०मे २०२०: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चौथा लॉकडाऊन सुरु झाल्यापासून मूळगावी गेलेले अनेक नागरिक पिंपरी-चिंचवड शहरात परतत आहेत. शहरात येणाऱ्या अनेक जणांची तपासणी केली जात नाही. त्यामुळे शहरातील रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही वाद होत आहेत. त्यासाठी बाहेरुन शहरात येणाऱ्या नागरिकांबाबत  नियमावली जाहीर करुन त्याची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे-पाटील यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नगरसेविका चिंचवडे-पाटील यांनी म्हटले आहे की, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सोमवार(दि.१८)पासून देशभरात चौथा लॉकडाऊन सुरु झाला आहे. परंतु, या कालावधीत शहरातून आपल्या मूळगावी गेलेले अनेक नागरिक परत शहरात येत आहेत. शहरातील उद्योग ३३ टक्के कामगारांच्या उपस्थितीत काही प्रमाणात सुरु झाले आहेत. व्यवसायांमुळे शहरामध्ये येणाऱ्या नागरीकांची संख्या वाढत आहे.

काही नागरिक रितसर परवानगी घेऊन येत आहेत. तर, अनेक नागरिक विनापरवाना लपून-छपून देखील शहरात येत असल्याची चर्चा नागरीकांमध्ये आहे. अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बाहेरून आलेल्या नागरीकांबरोबर वाद होत आहेत. नागरिकांमध्ये समज-गैरसमज, वाद-विवाद होऊ नयेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये याकरीता प्रशासनाने दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.

त्यासाठी महापालिका प्रशासन, आरोग्य विभाग आणि  पोलीस विभागाने समन्वयाने नियमावली करावी.  त्याचे जाहीर प्रगटन प्रसिद्ध करावे आणि त्याची कडक अंमलबजावणी करावी अशी मागणी नगरसेविका चिंचवडे यांनी निवेदनातून केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा