पुरंदर दि.२०मे २०२०: पुरंदरमधील गुळूंचे येथे झालेल्या विवाहामध्ये कोणीही कोरोना रूग्ण सहभागी नव्हता. या सोहळ्यास आलेल्या लोकांपैकी कोणी कोरोना रूग्णाच्या थेट संपर्कात नव्हता. त्यामुळे या भागातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये , असे आवाहन जेजुरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी केले आहे.
गुळूंचे येथे मंगळवारी( दि.१९) रोजी एक विवाह सोहळा पार पडला. यामध्ये आलेल्या वऱ्हाडी मंडळीतील नातेवाईक कोरोना पाॅजिटीव्ह असल्याचे आढळून आले होते. या रूग्णाला आधीपासूनच क्वारंटाइन करण्यात आले होते. विवाहाच्या दिवशी सकाळी त्या रूग्णाचा रिपोर्ट आल्यावर तो कोरोना पाॅजिटीव्ह असल्याचे समजले. त्यानंतर दोन्ही जिल्ह्यातील प्रशासनाने वेगाने हलचाली करीत तेथील पोलिस पाटीलांना या विवाह सोहळ्याच्या ठिकाणी जाऊन व-हाडी मंडळींना याबाबात कल्पना देत त्यांना दुर ठेवण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर पोहचलेल्या प्रशासनाने थोड्या वेळातच हा सोहळा अटोपता घेत वऱ्हाडींची रवानगी केली. मात्र ही बातमी परिसरात पसरल्यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने जेजुरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी घटना स्थळी भेट देत लोकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे