२२ मे पासून नवे लॉकडाऊन नाही ; अफवांमुळे संभ्रम

नाशिक, दि.२१ मे २०२०: लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात रेड झोन, कॅटेन्मेंट झोन वगळता दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू करण्यासाठी निर्बंध शिथिल करण्यात येत असताना नाशिक जिल्ह्यात २२ मे पासून अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णतः लॉकडाऊन करण्यात येणार आहे. असा मेसेज सध्या सोशल मिडियावरून व्हायरल होत आहेत. यामुळे जिल्हावासियांमध्ये पुन्हा एकदा घबराट निर्माण झाली आहे. शासनाच्या निर्देशानुसार निर्बंध शिथील करण्यात येत असून अशा प्रकारचा कोणताही निर्णय प्रशासनाने घेतला नसल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले.

गेल्या दोन महिन्यांपासून अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातील सर्व व्यवहार ठप्प असून सर्व नागरिक घरातच अडकून पडले आहेत. त्यामुळे आता सर्वजण बाहेर पडण्यासाठी बेचैन झाले आहेत. लॉकडाऊन कधी उठवणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

एकूणच परिस्थिती पाहता आता लॉकडाऊन लवकर उठवून पुन्हा दैनंदिन व्यवहार पूर्ववत व्हावेत, अशी प्रत्येकाचीच इच्छा आहे. त्यातच लॉकडाऊनच्या तिसर्‍या टप्प्यात उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. तसेच रेड झोनमध्ये कंटेन्मेंट झोन वगळून एकल दुकाने सुरू करण्यात आली. मात्र, दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू ठेवण्यासाठी वेळेचे निर्बंध टाकण्यात आले आहेत.

लॉकडाऊनमुळे सर्वचजण घरीच असल्याने सोशल मिडियाचा वापर वाढला आहे. त्यामुळे या काळात सोशल मिडियाचा गैरवापर होऊन विविध संदेश व्हारयल होत आहेत. अशाच प्रकारचा एक संदेश बुधवारी सकाळपासून सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. २२ ते ३१ मे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णतः लॉकडाऊन करण्यात येत असल्याचा हा मेसेज व्हायरल होत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

मात्र, अशा प्रकारचे कोणतेही आदेश काढण्यात आले नसून सायंकाळी ७ ते सकाळी ७ संचारबंदी लागू करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा