नाशिक, दि.२२मे २०२० : लॉक डाऊनमुळे जंगलातील प्राणी अन्न पाण्यासाठी मानवी वस्तीवर दाखल होऊ लागले आहेत. ग्रामीण भागात असणारा बिबट्या देखील आता शहरात दिसू लागला आहे. नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील वाघेरे येथे तुकाराम सिताराम भोर यांच्या शेतामध्ये नदीकडे जाणाऱ्या पाची आंबे या भागामध्ये साधारण दोन वर्षाचा बिबट्या मेलेल्या अवस्थेत आढळून आला असून त्याच्या पोटाला जबर जखम झालेली आहे. या घटनेत दोन बिबट्यांची झुंज झाली असावी आणि त्यात एकाच मृत्यू झाला असावा, अशी चर्चा परिसरातील नागरिकांतून ऐकायला मिळत होती.
बरगडी पासून पोटापर्यंत फाटलेल्या अवस्थेत असलेल्या मृत बिबट्याला पाहण्यासाठी वाघेरे परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
बिबट्याच्या मानेला जखमा झाल्या असून मृत बिबट्याच्या तोंडा मध्ये केस असल्याने दोन बिबट्यांची झुंज झाली असावी असा अंदाज लावला जात आहे.
या घटनेची खबर माजी सरपंच मोहन भोर यांनी वन विभागाला कळविली. वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडल अधिकारी दत्तू ढोन्नर, राव खैरगाव, सुरेखा आव्हड, वाळू आवाली यांनी प्रत्यक्ष पाहणी करून मृत बिबट्याला उत्तरीय तपासणीसाठी घोटी येथे नेण्यात आले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: