सातारा, दि.२४ मे २०२०: सातारा जिल्ह्यातील अवकाळी पाऊस व कोरोना विषांणूच्या संकटामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी वर्गास मदत करण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे. जिल्हयातील बहुतांशी शेतकऱ्यांना द्राक्षबाग लागवड, ब्रॉयलर, लेयर कुक्कुटपालन व कृषी पर्यटन प्रकल्प उभारणीसाठी बँकेने मोठया प्रमाणावर कर्ज पुरवठा केला आहे. त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न बँकेच्या संचालक मंडळाने केला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले की,
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने देशपातळीवर नावलौकिक मिळवला आहे. बँकिंग कामकाजाबरोबर विकासाभिमुख कार्यात बँक नेहमीच अग्रेसर असते.
भीषण दुष्काळामध्ये बँकेने दोन कोटी रुपये खर्च करून दुष्काळग्रस्त भागात टँकरने पाणी वितरण केले होते. यावर्षीही कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून बँकेने एक कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिली. तसेच मोलमजूरी काम करणारे मजूर व गरजू कुटुंबाना त्यांचे दैनंदिन उदरनिर्वाहासाठी जीवनावश्यक अन्नधान्याचे कीट उपलब्ध करून दिले आहे.
त्यासाठी जिल्ह्यातील गरजू कुटुंबाना सर्वसाधारण १७, ५०० किटच्या वितरणाचा लाभ होणार आहे. या जीवनावश्यक कीटसाठी बँकेने एक कोटी रुपये खर्च केले आहेत, अशी माहिती भोसले यांनी दिली.
न्युज अनकट प्रतिनिधी: