औरंगाबाद, दि.२६ मे २०२० : एमआयडीसीने औरंगाबाद शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता चिखलठाणा औद्योगिक क्षेत्रात विनावापर राहिलेल्या पूर्वीच्या मेल्ट्रॉन कंपनीच्या इमारतीत सुसज्ज असे कोविड केअर सेंटर उभारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. हे रुग्णालय पुढील १० दिवसांत महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री व महामंडळाचे अध्यक्ष सुभाष देसाई यांनी दिली.
१५ दिवसांपूर्वी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या इमारतीची पाहणी करून लवकरात लवकर रुग्णालय सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार रुग्णालयाचे काम पूर्ण झाले असून पुढील १० दिवसात कोविड रुग्णलाय कार्यान्वित होणार आहे.
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या पुढाकाराने मागील अडीच महिन्यांपासून राज्याच्या विविध भागातून स्थलांतरित झालेल्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात आहे.
आतापर्यंत सुमारे तीन लाख किलो धान्याचे वितरण करण्यात आले आहे. याखेरीज ‘मुख्यमंत्री-कोविड १९-मदत निधीस’ विविध उद्योगसमूहांकडून व कर्मचारी वेतनातून एकत्रित केलेली १०० कोटींची रक्कम देण्यात येत आहे. यापैकी ९० कोटी रुपये मुख्यमंत्री निधीत जमा करण्यात आले आहेत. शिवाय १५५ व्हेंटीलेटर्स, ५० हजार पीपीई किट्स, ८.५ लक्ष मास्क इत्यादी साहित्य एमआयडीसीमार्फत शासकीय रुग्णालयांना पुरविण्यात आले आहे.
न्युज अन कट प्रतिनिधी: