गुळूंचे गावात आपत्ती समितीच्या कर्मचाऱ्यांना गेट आउट !

पुरंदर, दि.२७ मे २०२० : “वाय यू केम हियर ? व्हॉट हप्पेंड ? गेट लॉस्ट ! गेट आउट फ्रॉम हिअर ! अँड डोन्ट कम हिअर अगेन ! ” असा सज्जड दम भरत गुळुंचे (ता.पुरंदर) येथील एकाने वैद्यकीय कर्मचारी बापू भंडलकर, तलाठी महाजन, पोलीस पाटील दीपक जाधव, आशा स्वयंसेविका मीनाक्षी निगडे यांना भरला. परगावाहून आलेल्या व्यक्तीला क्वारंटाईन करण्यासाठी गेलेल्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना चक्क या उच्च शिक्षित व्यक्तीने घराबाहेर काढले. हा प्रसंग झाल्यानंतर समितीच्या सदस्यांनी संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी समितीचे अध्यक्ष व सरपंच संभाजी कुंभार यांच्याकडे दाद मागितली.

मात्र, या व्यक्तीने उपसरपंच संतोष निगडे यांना फोन लावून सांगतो असे म्हणताच सरपंच कुंभार यांनीही पाय मागे घेतला. या घटनेने मात्र, हातात काहीही अधिकार नसताना कायदा व सुव्यवस्था कशी राखायची ? त्यापेक्षा शासनाने आता या कामासाठी केलेली नेमणूक रद्द करावी अन्यथा अशा व्यक्तींवर कारवाई करावी, असे मत या समितीच्या सदस्यांनी आता व्यक्त केले आहे.
दरम्यान, गुळुंचे गावात कोरोना संकटकाळाला सुरुवात झाल्यापासून सगळे नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत. यापूर्वीच “आव जाव घर तुम्हारा है ” असलेल्या या गावात शारीरिक अंतर राखणे, सॅनिटायझर वापरणे, मास्क लावणे याबाबत प्रचंड उदासीनता आहे. मतांची पोळी भाजून खाण्यासाठी सत्ताधारी गट कोणालाही दुखावत नाही. त्यातच आता ग्रामपंचायतीने अनोखा फंडा काढला आहे.

समितीत वैद्यकीय कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी असतानाही आता क्वारंटाईन करण्याची जबाबदारी चक्क पोलीस पाटलांवर टाकली असून नियम मोडणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची जबाबदारी दीपक जाधव यांच्यावर सोपवून आपले अंग झटकले आहे. मात्र, प्रत्यक्षात आज संबंधित व्यक्तीने नियमबाह्य काम करूनही त्याच्यावर कारवाई करण्याचे रीतसर पत्र देण्यास सरपंच कुंभार यांनी नकार दिला. उलटपक्षी समितीच्या जबाबदाऱ्या पोलीस पाटलांवर टाकून स्वतः नामानिराळे राहण्याची अजब युक्ती ग्रामसेवक जयेंद्र सूळ यांनी राबविली आहे. यासाठी एक पत्र पोलिस पाटलांना देऊन ग्रामपंचायत नामानिराळी होऊ पहात आहे.

पंचायतीला कळेना काम कसे करावे ?
कोरोना काळात गावात नियमाप्रमाणे काम करण्यास पंचायत अपयशी ठरली आहे. गावात आजही परगावाहून अनेकजण ये-जा करत आहेत. गावात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यास त्याला पंचायतीला जबाबदार धरण्याची मागणी यापूर्वीही अनेकांनी केली आहे. अक्रियाशील सरपंच व ग्रामसेवक यांमुळे गावाला ग्रहण लागल्याचे अनेकांनी बोलून दाखवले. तसेच कोरोना काळात जर मतदाराच उरले नाहीत तर राजकारण कशावर खेळणार ? असा प्रतिप्रश्न विचारात काहींनी राजकारण थांबविण्याकडे लक्ष वेधले आहे. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अक्षय निगडे यांनी केली असून वेळेत कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा