ग्रामीण भागातील सर्व व्यवसाय सुरू करावेत : हर्षवर्धन पाटील

9

इंदापूर, दि.३० मे २०२०: नागरिकांची आता कोरोनासह जीवन जगण्याची मानसिकता झालेली आहे. अनेक व्यवसाय सध्या बंद असल्याने नागरिक अडचणीत आलेले आहेत. त्यामुळे शासनाने महानगरपालिका क्षेत्रात वेगळा निर्णय घेऊन, राज्यातील ग्रामीण भागातील सर्वच व्यवसाय हे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पालन करण्याच्या अटीवर चालू करण्यास परवानगी देण्यास हरकत नाही, असे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी (दि.३०) व्यक्त केले.

राज्यामध्ये टाळेबंदी चालू होऊन सुमारे ६९ दिवस झाले. चौथा लॉकडाऊन रविवारी दि.३१ मे रोजी संपणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांनी वरील मत व्यक्त केले. कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी चांगली जागृतता आता नागरिकांमध्ये निर्माण झालेली आहे.

ग्रामीण भागात हॉटेल, चहा सेंटर आदी व्यवसाय बंद आहेत. हॉटेल व्यवसाय सुरू झाल्यास शेतकऱ्यांच्या दुधाला मागणी वाढेल व हजारो कामगारांना काम मिळेल. नागरिकांचा खाण्यापिण्याचा प्रश्नही सुटण्यास मदत होईल. ग्रामीण भागातील सर्वच व्यवसाय चालू करण्यास शासनाने परवानगी देणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.

तसेच शासनाने लग्नविधीसाठी ५० नागरिकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिलेली आहे. परिणामी सध्या लग्न लावण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसून येत आहे. नागरिक हे आपल्या घरी छोट्या लहान जागेत लग्न समारंभ उरकत आहेत. मात्र त्याठिकाणी बाहेरील नागरिक आल्याने कोरोनाचे संक्रमण होण्याच्या भीतीने परिसरातील नागरिक तक्रार करीत आहेत.

परिणामी, लग्न विधींना अडचणी येत आहेत.त्यामुळे मंगल कार्यालयांना ५० नागरिकांच्या उपस्थितीत लग्नसमारंभाला शासनाने परवानगी द्यावी, असे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.तसेच शाळा-कॉलेज जून महिन्यात चालू करणे योग्य ठरणार नाही असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे