पिंपरी, दि.३१ मे २०२०: पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र येथे नुकतेच ५५ वर्षीय पुरुषाच्या जठरातील उघडी सेफ्टी पिन दुर्बिणीव्दारे काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे.
हा रुग्ण रुग्णालयाच्या शल्यचिकित्सा बाह्यरुग्ण विभागात दाखल झाला होता. तीन दिवसापूर्वी जेवण करताना नकळत रुग्णाने सेफ्टी पिन गिळली होती.
ही सेफ्टी पिन जठरामध्ये अडकून बसली असे एक्सरेमध्ये दिसून आले. तातडीने रुग्णाचे सी टी स्कॅन करण्यात आले. त्यावेळी सेफ्टी पिन उघडी असल्याचे दिसून आले. ही उघडी सेफ्टी पिन जठराला इजा करू शकते म्हणून तातडीने एन्डोस्कोपी करण्यात आली. कोणत्याही प्रकारची चिरफाड न करता उघडी सेफ्टी पिन काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले. आता हा रुग्ण सुखरूप असून त्यांना दोन दिवसांनी घरी सोडण्यात आले आहे.
रुग्ण शल्य चिकित्सक डॉ. विरेंद्र आठवले यांच्या देखरेखी खाली उपचार घेत होते. मेडिकल गेस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. अमोल डहाळे यांनी दुर्बिणीद्वारे करण्यात आलेली ही प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली.
या संपूर्ण प्रक्रियेत शल्य चिकित्सा विभागाने प्रमुख प्राध्यापक डॉ. शहाजी चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील व सोसायटीच्या उपाध्यक्षा डॉ. भाग्यश्रीताई पाटील यांनी या प्रक्रियेत सहभागी डॉक्टरांचे कौतुक केले.
न्युज अनकट प्रतिनिधी