हडपसर दि. ३१ मे २०२० : लॉकडाऊनमध्ये महापालिकेकडून शहरातील बहुतांश भागात शिथिलता देताच, शहरातील व्यावसाय पुन्हा सुरू झाले आहेत. परिणामी नागरिकही मोठया प्रमाणात बाहेर पडत असून व्यवसाय तसेच घरगुती वापरासाठी पाण्याची मागणी वाढण्यास सुरूवात झाली आहे. त्याचा फटका शहरातील पाणी नियोजनास बसण्यास सुरूवात झाली आहे.
काळेपडळ तसेच महंमदवाडी परिसरात पुन्हा एकदा नागरिकांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत. लॉकडाऊनमध्ये काही दिवस या भागात पाणी मिळाले. मात्र, आता मागील आठवड्यापासून पुन्हा वेळी अवेळी आणि ते सुध्दा कमी दाबाने तसेच काही तासच पाणी मिळत आहे. त्यामुळे या भागातील नागरिक हवालदिल झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पुन्हा संपूर्ण काळेपडळ, चिंतामणी नगर, हांडेवाडी रस्ता सर्व सोसायटया, बडदे मळा, न्याती सोसायटी, महंमदवाडी गावठाण काही भाग, दोराबजी मॉल या भागात महापालिकेचा पाणीपुरवठा सुरळीत नसल्याचे चित्र आहे. या भागासाठी रामटेकडीच्या पाण्याच्या टाकीतून पाणी देण्यात येते. तर या भागात पाणी येत नसल्याने वेळोवेळी नागरिक तसेच लोकप्रतिनिधी महापालिकेवर मोर्चेही काढतात.
मात्र, त्यानंतर काही दिवस पाणीपुरवठा सुरळीत होऊन पुन्हा पाण्यासाठी ओरड सुरू होते. त्यामुळे या भागातील नागरिकांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच पाणीच मिळत नसेल तर आम्हाला लॉकडाऊनमध्ये पाण्यासाठी नाईलाजास्तव पाण्यासाठी गर्दी करावी लागेल त्यामुळे आमच्या आरोग्यासही धोका असून पालिकेने तातडीने पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली जात आहे.
आयुक्तांना निवेदन देणार काही दिवस आम्हाला पाणी मिळाले पण पुन्हा प्रभागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. त्यामुळे उद्या (सोमवारी) महापालिका आयुक्तांची शिवसेना पक्षनेते पृथ्वीराज सुतार, यांच्यासह भेट घेऊन निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे नगरसेवक नाना भानगिरे, यांनी दिली. तसेच प्रशासनाने ही बाब गांभीर्याने न घेतल्यास महापालिकेत पाणी पुरवठा विभागास टाळे ठोकण्याचा इशाराही भानगिरे यांनी “न्यूज अनकट” शी बोलताना सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे