मी कोरोना बाधित आहे… मला दाखल करून घ्या…

सोलापूर, दि.२ जून २०२०: सध्या कोरोनाच्या संकटाने सर्वच हैराण झाले आहेत. त्यात आता सोलापूर जिल्ह्यात महापालिकेचा आंधळा कारभार समोर आला आहे. एका तरुणाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याने सरकारी रुग्णालयात जाऊन सांगितले की, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आहे, मला ऍडमिट करून घ्या. असे म्हणत सम्राट चौकातील एका तरुणाने सिव्हील हॉस्पिटल आणि महापालिकेच्या भवानी पेठेतील दवाखान्यात फेऱ्या मारल्या. परंतु, त्याला दाखल करुन घेतले नाही. त्यानंतर ही गोष्ट एका नगरसेवकाला समजल्यानंतर त्याने विभागीय अधिकाऱ्याला फोन केला. त्यानंतर त्या तरुणाला केगाव येथील केंद्रात क्वारंटाइन करण्यात आले. तोपर्यंत पालिका प्रशासनाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते.

जिल्हा प्रशासनाने रविवारी रात्री जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची यादी जाहीर केली होती. त्यात सम्राट चौकातील एका तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याचे यातून स्पष्ट झाले होते. त्यावर हा तरुण रुग्णालयात दाखल होण्यासाठी धडपडत होता. मात्र याची कोणीही दखल घेतली नाही.

याबाबत वंचित बहुजन आघाडीचे गटनेते आनंद चंदनशिवे म्हणाले, हा तरुण सोमवारी सकाळच्या सुमारास सम्राट चौक परिसरात दुचाकीवर फिरत होता. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडे त्याने आपल्याला रुग्णालयात दाखल करुन घेतले नसल्याचे सांगितले.त्यानंतर कार्यकर्त्यांनी मला फोन केला. त्यानंतर मी महापालिकेच्या विभागीय कार्यालय दोनचे प्रमुख निलकंठ मठपती यांना फोन केला.

जोडभावी पेठ पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. एक तासाने रुग्णवाहिका आली आणि त्यानंतर प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करणारी गाडी आली. त्यानंतर त्या तरुणाला घेऊन गेली. त्याच्यावर आता उपचार सुरू आहेत.

महापालिकेचा कारभार या पध्दतीने सुरू असेल तर या शहराचे काय होईल, असा संताप चंदनशिवे यांनी व्यक्त केला.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा