यंदाच्या वर्षी बँकांनी ८५ टक्के पीक कर्ज वाटप करावे: धनंजय मुंडे

6

परळी, दि.२ जून २०२० : मागील वर्षी खरीप हंगामामध्ये बँकांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट केवळ ४१ टक्के पूर्ण झाले होते. यावर्षी हे उद्दिष्ट वाढवून पीक कर्ज वाटप ८५ टक्क्यांपर्यंत करावे, अशा सूचना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बँकेच्या प्रतिनिधींना दिल्या.

परळी येथे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मतदारसंघात खरीप हंगाम पूर्व कर्ज आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. मतदारसंघातील शेतकर्‍यांच्या अडचणी मागण्या तसेच बँकांना कर्ज वाटपाबाबत येणार्‍या अडचणी मुंडे यांनी समजून घेतल्या. मतदारसंघातील एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचीत राहू नये असे यावेळी मुंडे म्हणाले.

या बैठकीला जिल्हा निबंधक शिवाजी बडे, उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक, उपविभागीय अधिकारी श्रीमती शोभा जाधव, परळीचे तहसीलदार विपिन पाटील अंबेजोगाईचे तहसीलदार रुईकर, जि.प.गटनेते अजय मुंडे, नगर परिषद गटनेते वाल्मिक कराड, रा.काँ.चे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, रा.काँ.चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष राजाभाऊ पौळ यांसह मतदारसंघातील महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. ज्या शेतकर्‍यांचे कर्जमाफीमध्ये नाव आले. परंतू त्यांना कर्जमाफीचा लाभ प्रत्यक्षात आणखी मिळाला नाही, अशा शेतकर्‍यांना सुद्धा पीक कर्ज देण्यासाठी राज्य शासनाने धोरण आखले असून त्या धोरणानुसार शेतकर्‍यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे.

पीक कर्जामधील बेबाकी प्रमाणपत्राची अट शिथिल करावी, तसेच बँकांनी प्रत्येक गावात जाऊन कॅम्प घेऊन त्याद्वारे पीक कर्ज पूर्व संकलन करावे तसेच शेतकर्‍यांना बँकेत न बोलवता ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून कर्ज वाटप करावे अशा सूचना यावेळी मुंडे यांनी बँकेच्या प्रतिनिधींना दिल्या.

या बैठकीस परळी मतदारसंघातील सर्व प्रमुख बँकांचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते. दरम्यान कोरोना विषाणूच्या फैलावामुळे कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात मंदावली तसेच मान्सून हंगाम तोंडावर आल्याने थोड्याफार प्रमाणात पूर्वीचे पीक कर्ज बाकी असलेल्या शेतकर्‍यांना यंदा पीक कर्ज मिळणार की नाही अशी चिंता भेडसावत होती, मतदारसंघातील अशा सर्व शेतकर्‍यांना आता दिलासा मिळणार आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: