रेंज नसल्याने तलाठी चढले इमारतीच्या गच्चीवर

बीड, दि.६ जून२०२० : बीड जिल्ह्यातील वडवणी गावात सध्या शेतकर्‍यांची तलाठी सज्जावर झुंबड उडत आहे. शेतकर्‍यांच्या विविध प्रकारच्या अडचणी आणि तातडीने कागदपत्रे मिळण्याची गरज, हे लक्षात घेऊन एका तलाठ्याने कामाची धडपड काय असते हे दाखवून दिले आहे. त्यांच्याकडे रेंज नसल्यामुळे छतावर चढून त्यांनी शेतकर्‍यांची कामे सुरु केली आहेत. त्यांच्या कामाचे कौतूक होत आहे.

भूषण शांताराम पाटील असे त्या तलाठ्याचे नाव आहे. ते वडवणी तालुक्यातील साळिंबा सज्जावर कार्यरत आहेत. सध्या पाऊस होत असून आता पेरणीची सर्वत्र लगबग सुरु झाली आहे. आता पिककर्ज, विभागांच्या योजनांचा लाभ मिळविण्यासाठी तलाठी यांच्याकडून  सात-बारा, आठ-अ, विविध प्रमाणपत्रे असे दस्तऐवज जमा करण्यासाठी झुंबड उडत आहे. तलाठी सज्जाच्या ठिकाणी इंटरनेटला रेंज नसल्याने शेतकर्‍यांचे काम अडले व ते हतबल झाले. 

मात्र त्यांनी शेतकर्‍यांची कामे खोळंबू नयेत, यासाठी गच्चीवर बसून काम केले. गच्चीवर गेल्यानंतर इंटरनेटची समस्या दूर झाली आणि स्थानिक शेतकर्‍यांना तातडीने ऑनलाईन सातबारा देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांसह ग्रामस्थांनी त्यांच्या कामाचे कौतूक केले आहे.

दरम्यान, सध्या पिककर्ज काढण्यासाठी सातबाराची ऑनलाईन प्रत आवश्यक असते. त्यामुळे तलाठी सज्जावर शेतकर्‍यांची गर्दी होत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा