बारामतीत श्रीगणेश भाजी मंडई आजपासुन सुरु

बारामती, दि.६ जून २०२० : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरातील श्रीगणेश भाजी मंडई आज शनिवार (दि. ६ ) रोजी सुरू करण्यात आली. रात्री उशिरा मुख्याधिकारी योगेश कडूसकर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आज संपूर्ण भाजी मंडई धुवून घेण्यात आली .

तसेच निर्जंतुकीकरण औषध फवारणी करून प्रत्येक ओट्यावर पावडर फवारणी केली. मात्र रात्री उशिरा झालेल्या आदेशामुळे काही ठराविक दुकाने उघडली तर भाजी मंडई सुरू झाली माहीत नसल्याने भाजी व फळे खरेदीसाठी तुरळक ग्राहक असल्याचे चित्र पाहायला मिळाले. मंडई सुरू करण्यासाठी मुख्याधिकारी यांनी काही नियम लागू केले आहेत.

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २३ मार्च रोजी जाहीर केलेल्या लॉकडाऊन पासून भाजी मंडई भाजी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते गर्दी टाळण्यासाठी भाजी मंडई मागील ७० दिवसांपासून बंद ठेवण्यात आली होती. आज शनिवारी सकाळी भाजी मंडई स्वच्छ धुवून तसेच निर्जंतुकीकरण करून घेतली प्रत्येक ओटा व आसपास पावडर फवारणी करण्यात आली आहे.मुख्याधिका-यांच्या आदेशाप्रमाणे मंडई मधील व्यापाऱ्यांनी सम विषम पद्धतीने दुकाने लावण्यास सांगितले आहे. तसेच मुख्याधिकारी यांच्या सुचने प्रमाणे भाजी मंडईच्या आवारात वाहनांना येण्यास मनाई करण्यात आली आहे.सार्वजनिक ठिकाणी तंबाखु ,सिगारेट ओढण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बाजी मंडई सुरू राहील तर गुरुवारी असणाऱ्या आठवडे बाजारासाठी नवीन आदेश काढण्यात येईल असे सांगितले आहे. मंडईतील व्यापाऱ्यांनी सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायजर, ग्लोज इत्यादी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी घ्यायची आहे. अशी माहिती गणेश भाजी मंडई कर्मचारी दादासो जोगदंड यांनी दिली.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा