जालना, दि.१०जून २०२०: विठुरायाच्या दर्शनाची परंपरा यंदा कोरोनाने मोडीत काढली आहे.”भेटी लागी जिवा लागलेसी आस” ही भाविकांची स्थिती आहे. पंरतु कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने यावर्षी पायी दिंडी सोहळ्याला परवानगी दिली नसल्याने सलग आठ वर्षापासून सुरू असलेल्या भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील राजुरेश्वर साप्रदांयीक पायी दिंडी सोहळा रद्द करावा लागला असल्याने पंचक्रोशीतील वारकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. यामुळे सलग आठ वर्षापासून सुरू असलेला दिंडी सोहळा खंडीत झाला असल्याचे पिंपळगाव रेणुकाई येथील ह.भ.प.विष्णू महाराज सास्ते यांनी सांगितले आहे.
पिंपळगाव रेणुकाई परिसरातून सन २०१२ पासुन ह.भ.प.विष्णू महाराज सास्ते यांच्या नेतृत्वाखाली पायी दिंडी सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यात येते. या सोहळ्यात दरवर्षी परिसरातील लेहा, शेलुद, अवघराव सावंगी, पारध खुर्द, पारध बु.रेलगाव, कोसगाव, मोहळाई,पद्मावती,वालसांवगी आदी भागातील हजारो वारकरी आनंदाने सहभाग नोंदवीत असतात.
यंदा देखील या दिंडी सोहळ्याला ११ जुनला प्रतिवर्षाप्रमाणे रेणुकामाता मंदिरापासुन विठूरायाच्या दर्शनासाठी पायी प्रस्थान करण्यात येणार होते. मात्र कोरोनामुळे हा दिंडीसोहळा रद्द झाला आहे. त्यामुळे असंख्य वारकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. वारकऱ्यांसाठी हा सोहळा एक पर्वणीच असतो. दिंडीत जाण्यासाठी महिनाभरापासून भाविकांचे नियोजन सुरू असते. असेही त्यांनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी: