प्रख्यात लेखक, स्वातंत्र्यसैनिक व समाजसुधारक तसेच लहान मुलांचे लाडके असलेले साने गुरुजी यांची आज म्हणजेच ११ जून ला पुण्यतिथी आहे. इतकेच नव्हे तर ते समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक होते. साधी, सरळ, ओघवती भाषा, भावपूर्ण संस्कारक्षम निवेदनशैली हे त्यांच्या लेखणाचे विशेष गुण होते. श्यामची आई, नवा प्रयोग, सुंदर पत्रे, हिमालयाची शिखरे, क्रांती, समाजधर्म, आपण सारे भाऊ इत्यादी त्यांचे विपुल साहित्य प्रसिद्ध आहे.
साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला होता. त्यांच्या बालमनावर त्यांच्या आईने अत्यंत चांगले संस्कार केले होते. बालपणी त्यांच्या जीवनाच्या सर्व अवस्था आणि कक्षा व्यापणारी त्यांची आई ही त्यांच्यासाठी दैवतच होती. आई माझा गुरु आई माझे कल्पतरू असे आपल्या आईचे वर्णन त्यांनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकामध्ये आढळते.
त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी शिक्षकाची नोकरी करण्यास सुरुवात केली. शिक्षकाची नोकरी करताना त्यांना त्यांच्या आईकडून मिळाले संस्कार त्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ही नोकरी करत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनण्यासाठी तसेच सेवाभावी मनोर ते जपण्यासाठी धडे दिले. यानंतर त्यांनी १९२८ आली विद्यार्थी हे मासिक देखील सुरू केले होते.
नंतर पुढे त्यांनी १९३० झाली आपली शिक्षकाची नोकरी सोडून दिली. त्यांच्यावर महात्मा गांधींचा भरपूर प्रभाव पडला. यातून त्यांच्या मनात देशाविषयी प्रेम व स्वातंत्र्य लढ्या विषयी स्थान निर्माण झाले. महात्मा गांधींचा त्यांच्यावर इतका प्रभाव होता की ते स्वतः देखील खादीचे कपडे वापरत असे. शिक्षकाची नोकरी सोडल्यानंतर त्यांनी सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी ‘कॉंग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढणे, दुष्काळात शेतकर्यांधची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न करणे, जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील कॉंग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी कार्य करणे, इ.स. १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार, राष्ट्र सेवा दलाचे कार्य – या माध्यमांतून राजकीय कार्य केले.
समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाकठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले.