“माझ्या घरी काम करणाऱ्या मावशी सध्या येत नाहीयेत त्यामुळे घरातील सगळी कामं मलाच करावी लागत आहेत. सगळी म्हणजे अगदी सगळी…. कपडे धुणे, भांडी, झाडलोट, स्वयंपाक करणे इत्यादी सगळं माझ्यावर पडलं आहे”
घराघरात ऐकू येणारा, नक्की बोलला जाणारा हा सध्याच्या काळातला संवाद ! दुपारच्या जेवणानंतर हाच विचार माझ्या मनात भांडी घासता घासता आला आणि एकीकडे माझा फोन वाजत होता. हात ओले असल्याने फोन घेता आला नाही. जेमतेम एखादं भांड घासून झालं असेल आणि पुन्हा फोन वाजला. कोणाचं तरी महत्वाचं काम असेल म्हणून मी हात पुसले आणि फोन घेतला. “जागा आहेस का झाला तुझा अजगर” असं मंदार म्हणाला आणि डोळ्यासमोर डायरेक्ट रत्नागिरीच्या मधल्या मधल्या आळी मध्ये पत्याचा डाव रंगवायला निघालेले अंतू शेट आले. आमच्या ग्रुप मध्ये जरा कोणी बरं गुणगुणत बसलं तरी “नरड्यात मजा आहे हो तुमच्या” हे वाक्य कोणी ना कोणी म्हणतच. थोडक्यात, या ना त्या प्रकारे पु ल तुमचा अंतू आमच्यात वावरतो आहे.
खरं सांगु का स्टँड अप कॉमेडी ह्या प्रकारचा शोध आपल्या पुरता म्हणाल तर तो लावला पुलंनी असं म्हणावं लागेल. नामु परीट, सखाराम गटणे, अंतूबर्वा, चितळे मास्तर, असामी असामी, रावसाहेब, पेस्तनजी, मी आणि माझा शत्रूपक्ष, पाळीव प्राणी काय काय आणि किती किती उदाहरणं घ्यायची. पुलं तुम्ही खरे खरे भाषेचे, विनोदाचे संस्कार केले आहेत आमच्यावर. मी स्वतः “सखाराम गटणे” तर सोडाच पण साधा वाचक सुद्धा नाही. पण ह्या मोबाईल क्रांतीच्या युगात तुमच्या आवाजतल्या अनेक ‘किल्प्स’ मिळत गेल्या आणि आमची आणि आमच्यासारखी “वाचन प्रिय” पिढी सुद्धा तुमच्या पुलोत्सवात सहभागी झाली.
लोणचं मुरलं की जास्त छान लागतं ना तसं तुमच्या लिखाणचं आहे असं वाटतं. सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात हसण्याचे चार क्षण हवे असतात, ते हवे असले की “तुमचं” हे लोणचं चाखलं जातं आणि रंगत वाढते, आयुष्याची चव येते.
पुलं तुम्ही लिहिलेली वाक्य तशीच्या तशी एखादया प्रसंगात चपखल बसतात, असं आपलं माझं मत आहे. आता उदाहरण म्हणून हेच बघा
“शाळा कुठली, गिरण झाली आहे रे गिरण” – चितळे मास्तर
“पाच पूज्य पडत असतीलच? छे हो, मराठी चित्रपटात एवढी कुठली आली” – अंतूबर्वा
“मुबंई म्हणजे नुस्ता घाम नी घाम नी घाम” – पेस्तनजी
तुमची वाक्य नुसती लिहिली तरी आपोआप ते ते प्रसंग, पात्र डोळ्यासमोर येतात. तुम्ही एक अर्थी द्रष्टे होतात असंच म्हणावं लागेल.
अंतुशेट म्हणतात ना “माणुस गेल्यावर पेपरवाले काय, तुम्ही द्याल ते छापतील” तसं नाही पण एकच सांगतो पुलं, कोणीतरी म्हणलं आहे
“”देवानी आमचे लहानशे आयुष्य समृद्ध करायला दिलेल्या ह्या देणग्या, न मागता दिल्या होत्या आणि न सांगता नेल्या””
कोणीतरी नाही तुम्हीच म्हणलं आहे, रावसाहेब!
तुमच्या आमच्यावरच्या उपकारांची कधीच परतफेड होऊच नये हेच खरं! तुम्हाला आम्हा सगळ्यांचा मनाचा मुजरा!!!
– सुश्रुत भागवत