रावळपिंडी, दि. १३ जून २०२०: पाकिस्तानमधील रावळपिंडी शहरातील सदर भागात कोळसा केंद्र चौकात बॉम्बस्फोट झाला आहे. या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू झाला तर १५ लोक जखमी झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार हा स्फोट एका मोटरसायकलमध्ये झाला. या स्फोटात जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचबरोबर पोलिस आणि लॉ इन्फोर्समेंटने घटनेचे ठिकाण सील केले आहे.
हा बॉम्बस्फोट शहराच्या अशा भागात झाला जिथे पाकिस्तानी सैन्याचे मुख्यालय आहे. त्याचवेळी पोलिस प्रवक्ते साजिदुल हसन यांनी माध्यमांना सांगितले की, प्राथमिक अहवालात स्फोटक साहित्य विजेच्या खांबामध्ये ठेवल्याचे दिसून आले.
प्रवक्त्याने सांगितले, घटनेच्या आसपासच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या स्फोटात एका व्यक्तीचा जीव गेला. त्याचवेळी दोन मुलांसह १५ लोक जखमी झाले. बॉम्बस्फोट झालेली जागा अधिकाऱ्यांनी सील केली आहे व बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, तपास पथक आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबची टीम घटनास्थळावरून पुरावे गोळा करीत आहे. प्रवक्त्याने सांगितले की हा स्फोट संघटित दहशतवादाचा प्रयत्न आहे. जे लोकांच्या जीवाशी खेळत आहेत त्यांना कायद्यापासून सुटका मिळणार नाही. आतापर्यंत या स्फोटाची जबाबदारी कुणीही स्वीकारलेली नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी