माझ्या शरीरावर करोना विषाणूचे संशोधन करा; सोलापूर मधल्या कैद्याची मागणी

सोलापूर, दि.१३ जून २०२० : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यासह केंद्राकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, कोरोनावर अद्याप कोणतीही लस अथवा ठोस उपचार अद्याप सापडलेला नाही. तसेच जगभरात माकडाला लस देऊन त्यांच्यावर प्रयोग घेतले जात आहेत. त्यातच, माझ्याही शरीरावर कोरोना विषाणूचे संशोधन करा, अशी मागणी सोलापुरातील पॅरोलवर तुरुंगाबाहेर आलेल्या कैद्याने केली आहे.

पॅरोलवर असलेला कैदी गणेश हनुमंत घुगे याने माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ही मागणी केली आहे. कोरोनाच्या लसीसाठी आपले स्वतःचे जीवन अर्पण करण्यासाठी आपण तयार असल्याचे त्याने लेखी निवेदनात म्हटले आहे.

गणेश घुगे हा माढा तालुक्यातील कुर्डूवाडी गावचा रहिवासी आहे. गणेश घुगे हा सध्या औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील खुल्या जिल्हा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असून सध्या तो कोरोनामुळे पॅरोलवर बाहेर आला आहे.

कोरोनाच्या आजारावर उपचार संशोधनासाठी माझे शरीर मी स्वच्छेने देण्यास तयार आहे. जर शासनामार्फत अशी संधी मिळाली तर मी माझ्या जीवनाचे सार्थक झाले असे मी समजेन . देशासाठी, समाज हितासाठी माझे जीवन उपयोगी यावे असे मला प्रकर्षाने वाटते असेही कैदी गणेश घुगे यांनी प्रशासनाकडे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा