मुंबई, दि. १४ जून २०२०: कोविड -१९ च्या काळात राज्यात जाणवणाऱ्या रक्त टंचाईवर मात करण्यासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. रक्तदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी आता फेसबुकची मदत घेण्यात येणार आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या माध्यमातून यासाठी समाज माध्यमांचा वापर केला जाणार आहे.
राज्यभरातील ७१ शासकीय रक्तपेढ्यांची फेसबुकच्या रक्तदान मोहिमेच्या व्यासपीठावर नोंदणी करणार आहेत. एखाद्या रक्तपेढीला रक्ताची गरज भासल्यास ती पेढी फेसबुक पेजवर तशी मागणी करेल आणि शहरातील रक्तदात्यांना रक्तदानाबाबत संदेश जाईल असे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
आवश्यक त्या गटाचे रक्त वेळीच उपलब्ध झाल्यावर रुग्णाचे प्राण वाचू शकतात. फेसबुक सारख्या समाज माध्यमाचा वापर रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमासाठी झाल्यास त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो असा विश्वास प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांना व्यक्त केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी